आ.सुरेश धस यांची माहिती; आ.आजबे म्हणतायत दिशाभूल….
आष्टी : तालुक्यातील अहमदनगर सरहद्द, लोणी, धानोरा, हिवरा, गंगादेवी, सावरगाव ते वृद्धेश्वर या ६०० कोटी रुपये किंमतीच्या रस्ता कामासह आणखी ५ कोटी रुपये किंमतीच्या दोन रस्ता कामांना मंजुरी मिळाली आहे, त्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा केला, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हायब्रीड एनयूटी योजनेतील असलेला हा रस्ता असून त्यातील लोणी ते धानोरा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून मोठी वाहतूक असते. त्यांना कायमस्वरूपी रस्ता नादुरुस्तीमुळे अडचणी निर्माण होत होत्या. त्यांची कायमची परवड होत होती. त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक होते. तसेच हाच रस्ता पुढे हिवरा गंगादेवी सावरगाव आणि वृद्धेश्वरपर्यंत असून हे अंतर सुमारे ५० किलोमीटर अंतराचा आहे. हा रस्ता १० मीटर रुंदीचा असल्याने विस्तीर्ण आणि दर्जेदार होणार आहे. या रस्त्यामुळे दोन जिल्हे बीड आणि अहमदनगर हे एकमेकांना जोडले जाणार असून श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ, श्रीक्षेत्र कानिफनाथ आणि श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या तीन देवस्थानासाठी जाणार्या भाविक भक्तांना या दर्जेदार रस्त्यामुळे मोठी सुविधा मिळणार आहे. या रस्ता कामाच्या सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून असलेल्या रस्ते कामांच्या मागण्या मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
५ कोटींच्या दोन रस्ते कामांनाही मंजुरी
आष्टी तालुक्यातील रूटी ते खानापूर ३ कि.मी. या रस्ता कामाला २ कोटी ५० लाख रुपये आणि पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी ते चंद्रेवाडी या ४.५० कि.मी. रस्ता कामाला २ कोटी ५० लाख मंजूर मंजूर झाले आहेत.
जनतेची दिशाभूल-आ.बाळासाहेब आजबे
लोणी-मच्छिंद्रनाथगड-सावरगाव रस्ता सर्व्हेसाठी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर असताना ६०० कोटी सांगून जनतेची दिशाभूल केली जात आहे. उतावळा नवरा, गुढग्याला बाशिंग अशी आ.सुरेश धस यांची गत झाली आहे, अशी प्रतिक्रिया आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे.