एसपी साहेब, गणेश भिसेने नेमके कुणाचे भरलेत खिसे?

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे बीड

स्वराज्य जीआरबी घोटाळा

बीड : अंबाजोगाई येथील स्वराज्य जी.आर.बी. इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून संचालक असलेल्या गणेश राजाराम भिसेने ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला आहे. हा घोटाळा जानेवारी महिन्यात उघकीस आला. याप्रकरणी अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल झाला. घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींच्या घरात असल्याच्या संशयावरून आणि 37 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारींवरून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला. परंतु, या 6 महिन्यात गणेश भिसेने कोट्यवधी रूपयांची रक्कम नेमकी कुणाच्या खिशात घातली? याचा अंदाज सुद्धा आर्थिक गुन्हे शाखा लावू शकलेली नाही. त्यामुळे गणेश भिसेने नेमके कुणाचे खिसे भरलेत? असा सवाल आता थेट एसपी नंदकुमार ठाकूर यांना विचारण्याची वेळ आली आहे.

गणेश भिसे हा चोर असूनही त्याने शिरजोरपणा केला. केलेल्या घोटाळ्याची तक्रार करणार्‍या एका ठेवीदाराचे अपहरण करण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. त्याने आखलेला अपहरणाचा डाव माजलगाव शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून पोलीस कोठडीत आहे. या भिसेने काही वर्षांपूर्वी स्वराज्य जी.आर.बी. इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनीअंतर्गत विविध उद्योग कागदोपत्रीच सुरु केले. त्या उद्योगासाठी आर्थिक गुंतवणूक करणार्‍यांना 100 दिवसांत दीड पट रक्कम देण्याचे आमिष दाखवणारी योजना आणली. यातून बीडसह परजिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी जमा केल्या आणि हा भिसे अचानक कार्यालय बंद करून फरार झाला. प्रशस्त कार्यालय, हातात अंगठ्या, गळ्यात साखळ्या, सोबत बाऊंसर आणि आलिशान गाडी असे उच्च राहणीमान पाहूनच अनेक ठेवीदार बळी पडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सतिश मस्के या ठेवीदाराच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन 6 महिने झाले. काही ठेवीदारांवर तर फाशी घेण्याची वेळ आलीय. अशा परिस्थिती आर्थिक गुन्हे शाखेकडून मात्र ‘त्याला जामीन मिळाला आहे, त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे’ याउपर काहीही उत्तर दिले जात नाही. ठेवीदारांनी पुढे येऊन तक्रार देण्याचे साधे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलेले नाही. घोटाळेबाज गणेश भिसेने अंबाजोगाईत गुन्हा दाखल होताच जामीन मिळविला, न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी शर्थींचे उल्लंघन करून आर्थिक गुन्हे शाखेच्या नाकावर टिच्चून बाहेर फिरत होता. अशातच तो माजलगावच्या अपहरणाच्या प्रकरणात जाळ्यात अडकला आहे. या गुन्ह्यात पुन्हा त्याला जामीन मिळेल आणि तो मोकाट फिरेल, असेच काहीसे चित्र दिसत आहे. त्यामुळे ठेवीदारांनीच आता आंदोलन उभारण्याची गरज आहे.

धनंजय मुंडेंनी केला होता तारांकित प्रश्न
स्वराज्य जीआरबी घोटाळा प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी गत अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी गृह विभागाने तपास सुरु असल्याचे जुजबी उत्तर दिले होते. त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे यांनी पोलिसांना योग्य दिशेने तपास करण्याबाबत आदेशित करावे, अशी मागणी ठेवीदारांमधून होत आहे.

Tagged