ACB TRAP

तलाठी भरतीत बीडचे ‘ते’ रॅकेट पुन्हा सक्रीय?

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

टोकन रक्कम घेऊन उमेदवारांचे भरले जात आहेत फॉर्म

बीड : राज्यात तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 17 जुलै ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. एकूण 4644 जागांसाठी टीसीएसमार्फत याची परिक्षा घेण्यात येत आहे. मात्र असे असले तरी टीसीएसने काही खासगी सेंटरमार्फत परिक्षा घेण्याचे नियोजन केलेले असल्याने हे सेंटरच मॅनेज करून गैरमार्गाने काही उमेदवारांना तलाठी भरती प्रक्रीयेत पात्र केले जाणार आहे. हा सगळा खटाटोप करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुर्वीपासून कार्यरत असलेले रॅकेट पुन्हा एकदा सक्रीय झाल्याची खात्रीलायक माहिती हाती येत आहे. मात्र असे असले तरी कुणाही विद्यार्थ्यांने दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केले आहे.

2021-22 साली राज्यात झालेल्या विविध भरती प्रक्रीयेत बीड जिल्ह्यातील काही ठराविक गावातील दलालांनी सरकारी भरती परिक्षेचा ताबा घेतलेला होता. मात्र पुणे सायबर पोलीसांनी दलालांच्या या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला होता. आरोग्य भरती प्रक्रीयेतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या संपूर्ण परिक्षाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील पोलीस भरती, यावर्षी झालेली मुंबई पोलीस भरती प्रक्रीयेत बीड जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना पोलीसांनी अटक करून प्रत्येकावर गुन्हा नोंद केलेला आहे. त्यामुळे आता जो कोणी गैरप्रकार करेल आणि जो कोणी याला बळी पडेल त्या सगळ्यांवरच कारवाई सुरू झालेली आहे. उमेदवारांनी दलालांमार्फत अशा कुठल्याही गैरप्रकारात सहभागी होऊ नये, असे वारंवार अवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही दलाल उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत लाखो रुपये उकळत असल्याचे दिसून येत आहे. पैसे देणारे आणि पैसे घेणारेही दोघेही भविष्यात अडचणीत येणार आहेत.

दलाल घेतायत तीन लाखांचे टोकन
कार्यारंभला मिळालेल्या माहितीनुसार दलाल प्रत्येक उमेदवारांकडून प्रत्येकी तीन लाख रुपयांचे टोकन घेत आहेत. एकूण 25 लाख रुपयांमध्ये तलाठी करून देण्याची ऑफर उमेदवारांसमोर ठेवण्यात आलेल्या आहेत. जो टोकन रक्कम देईल त्याला कुठल्या जिल्ह्यात कसा फॉर्म भरायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे.

2019 ची तलाठी भरती वादात
दरम्यान 2019 मध्ये जी तलाठी भरती करण्यात आली ती भरती प्रक्रीया आता वादात सापडलेली आहे. मुंबई पोलीस भरतीमध्ये जो आरोपी पकडण्यात आला त्याने आपण 2019 च्या तलाठी भरती प्रक्रीयेत गैरप्रकार केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. त्यामुळे 2019 च्या तलाठी भरती प्रक्रीयेत ज्या ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केले त्या सगळ्यांच्या नोकरीवर गडांतर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 2017-18-19 च्या टीईटीमध्ये गैरप्रकार केलेले 7800 शिक्षक 2022 मध्ये घरी बसविण्यात आलेले आहेत. त्यात काही जिल्हा परिषद शाळा आणि खासगी संस्थांवर नोकरीला देखील लागलेले होते. मात्र त्यांचा जुना घोटाळा उघडकीस आल्याने सगळ्यांना नोकर्यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे गैरप्रकार एक ना एक दिवस उजेडात येणार असून कुठल्याही उमदेवारांनी गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन राहुल कवठेकर यांनी केले आहे.

खासगी केंद्रावर परिक्षा घेऊ नका-राहुल कवठेकर
टीसीएसची परिक्षा प्रक्रिया पारदर्शक असते. त्यामुळे मोठ्या लढाईनंतर आम्ही इतर संस्थांकडून ही भरती प्रक्रीया काढून घेऊन ती टीसीएसकडे सोपवण्यास सरकारला भाग पाडले. परंतु आता टीसीएस अनेक शहरात खासगी सेंटर देत असून या सेंटरमार्फत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्यात येत आहेत. भविष्यात टीसीएससुध्दा या गैरप्रकारात सहभागी झाली आहे असे उघडकीस येऊ नये. सरकारने आजच टीसीएसला खासगी सेंटरवर परिक्षा घेण्यास बंदी घालावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.

फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस
तलाठी भरतीचा फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने फॉर्म भरताना उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी अर्ज भरणार्‍यांमधून होत आहे. तसेच बीड, अंबाजोगाई हे होम सेंटर आता मिळत नसल्याने उमेदवारांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असून उमेदवारांमधून संताप व्यक्त केला जातोय.

Tagged