चार दिवसाची पोलीस कोठडी
बीड दि.17 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात फरार असलेला आरोपी योगेश उर्फ धनेश नवनाथराव करांडे (रा.बीड) यास भक्ती कन्स्ट्रक्शन येथील आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने योगेश करांडेस चार दिवसाची (20 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांची रक्कम न मिळाल्याने शिवाजीनगर पोलीसात अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन विश्वनाथ शिंदे, मनीष बबन शिंदे, योगेश नवनाथराव करंडे, अश्विनी सुनील वांढरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यातील अनिता शिंदे या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर रविवारी योगेश करांडेस पोलीसांनी अटक केली. योगेश करांडे यांचा बँकेच्या संचालक मंडळात सहभाग नसल्याची माहिती आहे. परंतू ठेवीदारांना अधिकच्या ठेवीचे अमिष दाखवून बँकेत ठेव ठेवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे करत आहेत.
संचालक मंडळाचा मेळ लागेना!
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली, या प्रकरणात गुन्हा दाखल होवून दोन आठवड्याचा कालावधी उलटला, पंरतू अद्यापपर्यंत पोलीसांना या बँकेतील संचालक मंडळाचा मेळ लागलेला नाही. दरम्यान कोठीडत असताना अनिता शिंदेंनी सांगितले की, बँकेचे व्यवहार मला अंधारात ठेवून केलेले आहेत, कधीही विचारत घेतलेले नाही. त्यामुळे संचालक मंडळात कोण आहे, याची माहिती नाही.