बीड : लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी राहिलेल्या हुंड्यासाठी उर्मीलाचा सतत सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. एकदा न्यायालयात जावून प्रकरण मिटले. अनेकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करुन मिटवले. यामध्ये दहा ते बारा वर्षाचा कालावधीही गेेला. दरम्यान दोन मुले झाली आता आनंदाने संसार करतील असे नातेवाईकांना वाटत होते. पण उर्मीला आणि रमेश यांच्या संसारामध्ये आनंद कधी आलाच नाही. नेहमीच दोघांमध्ये वाद होयचा. अन् 35 हजार रुपयांच्या हुंड्यासाठी सुरु झालेला वाद हा उर्मीलाचा बळी घेवूनच मिटला. उर्मीलाच्या हत्याप्रकरणी पतीसह सासु, सासरे, दिर, जाऊ यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी अटक असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मयत महिलेचा भाऊ सर्जेराव देवळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फीर्यादीत म्हटले आहे की, बारा वर्षापुर्वी उर्मीला आणि रमेश यांचा विवाह झाला होता. यावेळी 85 हजार रुपये हुंडा लग्नात ठरला होता. त्यापैकी 50 हजार दिले होते तर 35 हजार रुपये बाकी होती. त्यामुळे सासरच्या मंडळीकडून सतत मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. या प्रकरणी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रारही देण्यात आली होती. तसेच शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर उर्मीलाचे नांदणे मोडेल म्हणून प्रकरण तडजोड करुन मिटवले. दरम्यान उर्मीलास शुभम (वय 10), समर्थ (वय 8) अशी दोन मुले झाली. दिवाळीसाठी उर्मीला माहेरी आली. परत तिला वडीलांनी सासरी सोडल्यानंतर सासरच्या मंडळींनी तू परत कशाला आलीस म्हणत मारहाण केली. त्यानंतर परत उर्मीला एक महिना माहेरी राहिली. काही नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर उर्मीला सासरी आली. तेव्हापासून ती सासरी नांदत होती. नंतरही सासरची मंडळी त्रास देत होते. घटनेच्या एक दिवस आगोदर उर्मीलाने फोन करुन सांगितले होते की पती हा जास्तच त्रास देत आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री समजले की, उर्मीलाचा तिच्या पतीने खून केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पती रमेश सर्जेराव मस्केवर खूनाचा गुन्हा तर सासरे वैजीनाथ मस्के, सासु चंद्रकला मस्के, दिर गणेश मस्के, जाऊ सारिका मस्के यांच्यावर 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्करराव सावंत, सपोनि.गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.आंतरम करत आहेत.
जादुटोणा, करणी केली म्हणून सतत वाद
‘मला करणी केली आहे, माझ्यावर जादुटोणा केला आहे’. असं म्हणत उर्मीला सतत वाद घालायची. रात्रंरात्रं झोपत नव्हती. त्यामुळे आई-वडीलांपासून वेगळं राहिलो. तरीही घरातील वाद काही बंद होत नव्हता. या प्रकाराला वैतागून उर्मीलाचा खून केला. अशी कबुली स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आरोपी पतीने दिली.
दिवसभर खूनाचा कट रचला
वैतागलेल्या रमेशने उर्मीलाला कायमचे संपवायचे या तयारीने कट रचला. घटनेच्या दिवशी दुपारी एक नवीन कोयता धार लावून आणला होता. तिला गाडीवर बसवून दुर नेत मानेवर, डोक्यात कोयत्याचे तब्बल 29 वार केले. उर्मीला गेली आहे अशी खात्री पटल्यानंतर घटनास्थळावरुन थेट शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.
आरोपीला तीन दिवसाची कोठडी
या प्रकरणी मुख्य आरोपी रमेश वैजीनाथ मस्केसह इतर सर्व आरोपींना शनिवारी (दि.30) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची (1 जून पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.