yes bank

येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत छापे

देश विदेश

मुंबई : राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर तपास यंत्रणांनीदेखील जुन्या फाईलींवरची धूळ झटकून तपासाला गती दिली आहे. बँकिंग क्षेत्रात गाजलेल्या येस बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचनालयाने आज सोमवारी मुंबईत बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले. दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर अचानक ‘ईडी’ने कारवाईचा धडाका लावल्याने येस बँक घोटाळ्यातील संशयितांमध्ये धडकी भरली आहे.

दोन महिन्यांच्या दीर्घकालीन लॉकडाउनमधून मुंबईची काहीअंशी सुटका झाली असून शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर प्रशासन आणि इतर यंत्रणा कार्यरत झाल्याचे आजच्या ‘ईडी’च्या कारवाईने दिसून आले. येस बँकेतून मोठी कर्जे घेतलेल्या कंपन्या ‘ईडी’च्या रडारवर आहेत. आज पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘कॉक्स अँड किंग्ज’ या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर ‘ईडी’कडून छापे टाकण्यात आले. ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या पाच कार्यालयांची आज ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या आधी मार्च महिन्यात ‘ईडी’ने ‘कॉक्स अँड किंग्ज’चे प्रवर्तक पीटर केरकर यांना समन्स बजावले होते. ‘प्राइसवॉटर कूपर्स’ने फेब्रुवारीत केलेल्या फॉरेन्सिक ऑडीटमध्ये ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे संशयास्पद असल्याचे आढळून आले होते. तसेच २१००० कोटींचा निधी संशयास्पदरित्या वळवला असल्याचे तपासात आढळले होते.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात कॉक्स अँड किंग्जचे शहरातील मुख्य कार्यालय आहे. यासह चार आणखी कार्यालयात आज ‘ईडी’च्या तपास पथकांनी धाडी टाकल्या आहेत. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने येस बँकेतून २२६० कोटींचे कर्जे घेतले आहे. या व्यवहारात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून त्याअंतर्गत आजचा तपास करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे त्यासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता, कंपनीचे आर्थिक व्यवहार आदी माहिती घेण्यात आली आहे.

आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्च रोजी निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. तर बँकेची सर्वात मोठी कर्जदार असलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक कपील वाधवान आणि धीरज वाधवान सध्या अटकेत आहेत.

Tagged