r raja

बीडच्या पोलीस अधीक्षकांची होणार चौकशी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

गृहमंत्र्यांचे कारवाईचे संकेत

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधिमंडळात लक्षवेधी केली. या लक्षवेधीवर झालेल्या चर्चेदरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात सत्ताधारी आमदारांनीच लक्षवेधी केल्याने राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली. सभागृहात बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी हे अधिकार्‍यांकडून हप्ते घेतात. त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून राज्य शासन बदली करणार का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी जिल्ह्यात अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. वाळूमाफियांमुळे गेवराई येथील चौघांचा बळी गेला. तसेच सातत्याने चोर्‍या, दरोडे होतात, परंतु पोलिसांना चोरांचाही शोध लागत नाही, असे सोळंके म्हणाले. यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, हा प्रकार गंभीर असून पोलिस अधीक्षकांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात येईल. चौकशीचा अहवाल येत्या 15 दिवसात सादर केला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले. या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, नमिता मुंदडा यांच्यासह इतर सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला गोळीबार हा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केल्याचे सांगितले. यांच्याकडे पिस्तूल येतात कुठून? याची चौकशी करण्याची मागणी केली.

मी आमदार असूनही असुरक्षित : नमिता मुंदडा
आपण कुटुंबीयांसमवेत शहराजवळ एका हॉटेलवर गेले असता त्या ठिकाणी दारू पिऊन गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गंभीर असून देखील पोलीस अधीक्षकांनी आपल्याला साधा कॉल देखील केला नाही. तसेच सुरक्षेच्या संदर्भात कसल्याही प्रकारची विचारपूस करण्यात आली नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे आमदार मुंदडा म्हणाल्या. या घटनेवरून आपण देखील असुरक्षित असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविणार
बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी होणार आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरु झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

Tagged