BALASAHEB AJABE SURESH DHAS MAHEBOOB SHAIKH

आष्टीत कोणाची मर्जी चालणार? मराठा की ओबीसी?

बीड

बालाजी मारगुडे । बीड
दि.4 : क्षेत्रफळ आणि मतदानाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यांचा समावेश होतो. पाटोदा, आष्टी आणि शिरूर असे हे तीन तालुके आहेत. या मतदारसंघाचा बहुतांश भाग हा नगर जिल्ह्याला लागून आहे. वेगवेगळी गड, छोटी मोठी धार्मिक संस्थानं आणि इतर तालुक्यातील गडांचा प्रभाव या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवितांना गडांची मर्जी देखील महत्वाचा रोल निभावते. माजी मंत्री सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे आणि आ. बाळासाहेब आजबे या तिघांचा त्रिकोण भेदून इथून सामान्य घरातील मुस्लिम कुटुंबातील महेबूब शेख हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. याही पलिकडे जावून अशाही चर्चा होत आहेत की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणारे, त्यांचा राजकीय ‘बॅकबोन’ असलेले आणि मॅनेजमेंट गुरू वाल्मीकआण्णा कराड हे देखील आष्टीतून नशिब अजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणुकांना अजून अवकाश असला तरी चर्चांचा मात्र जोर वाढलेला आहे. आता येणार्‍या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा कशाप्रकारे तापतो? ओबीसी त्यांना कशाप्रकारे विरोध करतात यावर येथील राजकीय अंदाज बांधले जाणार आहेत.

MAHAYUTI
MAHAYUTI

महायुतीचे कसे आहे चित्र?
आष्टी मतदारसंघात महायुती MAHAYUTI म्हणजेच भाजपा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये ही जागा अजित पवार गटाकडे जाते. कारण या जागी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत. ज्यांचा जिथे आमदार त्यांची ती जागा असे धोरण महायुतीत आहे. पण या धोरणाला छेद देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. सुरेश धसांसाठी आम्ही आष्टीचा जागा मागवून घेऊ. त्या बदल्यात अजित पवारांना गेवराईची जागा देवू असे त्यांनी जामखेड येथील सभेत स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे विद्यमान आमदार असतानाही बाळासाहेब आजबेंना थांबवले जाते का हे पहावे लागणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेची ताकद या मतदारसंघात नगण्य असल्याने त्यांचा या जागी कसलाही दावा नसणार आहे. माजी आ. भीमराव धोंडे हे देखील भाजपामध्येच आहेत. सुरेश धसांना इथे तिकिट दिले तर त्यांचा निर्णय काय असणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीचे कसे आहे चित्र?
महाविकास आघाडीतील MAHAVIKAS AGHADI शरद पवार गट, उध्दव ठाकरे गट आणि काँग्रेस यापैकी ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार आहे. या मतदारसंघात उध्दव ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची ताकद अगदीच नगण्य आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाचा या मतदारसंघावर कसलाचा दावा नसणार आहे. शरद पवार गटाकडून विद्यमान परिस्थितीत युवकचे प्रदेशाध्यक्ष असलेले महेबूब शेख हे इच्छूक आहेत. नाही म्हणायला माजी आ. साहेबराव दरेकर, सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी देखील उमेदवारी मागीतलेली आहे. परंतु इथे महेबूब शेख यांच्याच नावाचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. महेबूब शेख हे शरद पवार, खा. सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जवळचे आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रभाव किती?
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचा आष्टी मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीत खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना वॉर्निंग म्हणून या मतदारसंघात दोन मोठ्या सभा घेतल्या. परिणामी महाविकास आघाडीकडून कोणीही प्रभावी माणूस नसतानाही पंकजाताईंचे मताधिक्य आष्टी मतदारसंघातून घटले होते. इतकच नाहीतर शेवटच्या फेरीत जी गावे मोजायची राहीली होती त्या सहा गावांनी बजरंग सोनवणेंना एकतर्फी मतदान दिले होते. त्यामुळे पंकजाताईंचा 31 व्या फेरीत विजय टप्प्यात आलेला असताना 32 व्या फेरीत मात्र साडेसहा हजार मतांनी पराभव सहन करावा लागला. परंतु जातीच्या समिकरणात मराठ्यांची संख्या किती आणि उमेदवार उभे राहणार किती? त्यामुळे मराठा मतांचा परिणाम होईल का?

ओबीसी फॅक्टर चालणार का?
आष्टी मतदारसंघात ओबीसी मतांची ताकद देखील मोठी आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून पंकजाताई मुंडे यांना जवळपास 32 हजार 221 मतांचे मताधिक्क्य होते. त्यामुळे ओबीसींची मते इथे प्रभावी किंबहुना निर्णायक ठरणार आहेत. विधानसभा निवडणूक जातीच्या प्रश्नावर झाली तर इथून प्रभावी ओबीसी उमेदवाराचा कोणीच पराभव करू शकत नाही. म्हणजेच आजघडीला जातीय समिकरणात बीड जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आष्टी हा ओबीसींच्या बाजुने झुकलेला आहे.

suresh dhas
suresh dhas

माजी आ. सुरेश धस कमबॅक करणार का?
2014 मधील पराभवानंतर सुरेश धसांना SURESH DHAS आष्टीतून तिकिट मिळालेले नाही. 2018 साली त्यांना धाराशीव -बीड -लातूर या स्थानिक संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी मिळालेली होती. दोन महिन्यांपुर्वीच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली आहे. सुरेश धस यांनी 1999 ते 2014 अशी सलग 15 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. सुरूवातीच्या दोन टर्म स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत भाजपच्या चिन्हावर तर 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर ते निवडून आले होते. 2014 मध्ये गोपीनाथाव मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविल्यामुळे पुढे विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतांचा त्यांना फटका बसला होता. ओबीसींची ही नाराजी दूर करण्यासाठी धसांनी 2017 मध्ये घड्याळ चिन्हावर निवडून आलेले पाच जिल्हा परिषद सदस्यांना भाजपाच्या हवाली करीत पंकजाताईंचा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष केला. त्याची बक्षीसी म्हणून धसांना विधान परिषदेवर घेण्यात आले. राजकीय मैदानावर ज्या प्रमाणे शरद पवारांचा भरवसा देता येत नाही त्याप्रमाणे सुरेश धसांचा देखील काहीच भरवसा देता येत नाही, अशा त्यांच्या आजपर्यंत राजकीय भुमिका राहील्या आहेत. आष्टीतून पंकजाताईंना मिळालेले कमी मताधिक्क्यामुळे पंकजाताईंची नाराजी आहेच. परंतु धसांना आता फडणवीसांची साथ असल्याने ते भाजपचे तिकिट मिळवतील, अशी शक्यता वाटते. मतदारसंघातील प्रत्येक कोपर्‍यातील खडा न् खडा माहिती असलेले धस कोण्या गावातून कोणत्या बूथवर कोणत्या घराने आपल्याला मतदान केले नाही, याची बसल्या बसल्या त्यांना माहिती असते. गड, संस्थानांवरील सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतोच. गावातील सप्ताह, जत्रा यांना देखील त्यांची आवर्जून उपस्थिती असते. तोरणदारी अन् मरणदारी भेट देवून ते वैयक्तीक जनसंपर्कावर जास्तीत जास्त भर देतात. मागच्या टर्मला बाळासाहेब आजबेंचे त्यांनी अंधारातून काम करून त्यांना आमदार केले होते. यावेळी बाळासाहेब आजबे त्यांच्या त्या उपकाराची परतफेड करतील अशी धस समर्थकांना आशा आहे.

BALASAHEB AJABE
BALASAHEB AJABE

बाळासाहेब आजबेंना संधी आहे का?
2019 मध्ये बाळासाहेब आजबे BALASAHEB AJABE आमदार झाले. मतपेट्या फुटूस्तोवर आष्टीत धोंडेच आमदार होतील असे गणित होते. परंतु धसांनी धोंडे यांची सगळी गणितं उलटी पालटी करून आजबेंवर विजयी गुलाल उधळला होता. शरद पवारांनी आजबेंना ऐनवेळी बळजबरी उमेदवारी दिली होती. अ‍ॅक्सिडेंटल आमदार म्हणूनच आज त्यांच्याकडे पाहीले जाते. आष्टीत बाळासाहेब आजबे यांची स्वतःची म्हणून अशी ताकद फार कमी आहे. पक्षाच्या ताकदीवर त्यांचा डोलारा आहे. पाच वर्षात त्यांनी कार्यकर्त्यांचा मोठा संच जमा केला असे दिसलेले नाही. विकास कामांबाबत मात्र त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. परंतु आरक्षण प्रश्नामुळे सगळी गणित जातीच्या अँगलने बघीतली जाणार आहेत. त्यात आजबे यांना संधी किती हा प्रश्न असेल. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाची ती जागा असे महायुतीचे धोरण असले तरी बाळासाहेब आजबेंसाठी पक्ष फडणवीसांसोबत आष्टीची प्रतिष्ठा करेल असे वाटत नाही.

mahebub shaikh
mahebub shaikh

महेबूब शेख जातीच्या समीकरणात बसतात का?
मेहबूब शेख MAHEBOOB SHAIKH हे सामान्य परिवारातील तरुण. सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकारणात एन्ट्री झाली होती. धस यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महेबूब शेख हे राष्ट्रवादीतच राहिले. पुढे त्यांची शरद पवार, जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून पुढे आले. या तिघांनीही महेबूब शेख यांना बळ दिले. महाविकास आघाडीतील राज्याच्या प्रमुख नेत्यांमध्ये महेबूब शेख यांची उठबस असल्याने आष्टी मतदार संघातून कोणाला उमेदवारी द्यायची यात सर्वात आधी महेबूब शेख यांचे नाव घेतले जाते. पक्षीय पातळीवर शेख यांना उमेदवारी देण्यास कसलीही अडचण नाही. परंतु मतदार संघातील मतदार त्यांना स्विकारणार का हा खरा प्रश्न आहे. कारण आहे जातीचे समीकरण. आष्टी मतदार संघात मुस्लिम समाज फार थोडा आहे. मराठा समाज मुस्लिम उमेदवार स्विकारणार का? लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज हा मोदी विरोधात होता तर मराठा समाज हा फडणवीस यांच्या विरोधात होता. पण शेवटी दोघांचेही टार्गेट भाजपा होते. त्यात संविधान बदलले जाणार ही भीती घालून दलीत समाजाने या दोघांना साथ दिली. पण विधानसभेत मराठा, मुस्लिम, दलीत समाज एकत्र येईल याची शाश्वती नाही. मुस्लिम उमेदवाराला मराठा समाज खरेच साथ देईल का हा देखील प्रश्नच आहे. परंतु महेबूब शेख यांच्याकडे मुस्लिम चेहरा म्हणून कोणी पहात नाही. सर्व सामान्य घरातील शिरूर कासार या छोट्या शहर वजा खेड्यातील तरुण असे म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवाय राज्याच्या राजकारणाचा विचार करता शरद पवार गटाला कोणीतरी मुस्लिम चेहरा रिंगणात उतरववा लागणार आहे. त्यामुळे महेबूब शेख यांचा पक्ष नक्की विचार करेल असेच दिसते. शिवाय दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी आष्टी, गेवराई, परळीमध्ये तरुणांना संधी देणार असे जाहीर केले असल्याने महेबूब शेख समर्थकांच्या आशा उंचावलेल्या आहेत. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या सारख्या नेत्यांनी महेबूब शेख यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तर सामान्य घरातील मुलगा देखील आमदार होऊ शकतो हे राज्याला बघायला मिळेल.

WALMIK KARAD
WALMIK KARAD

वाल्मीकअण्णा कराड यांचे नाव का आले चर्चेत?
लोकसभा निवडणुकीत अत्यंत कठीण परिस्थितीत वाल्मीकअण्णा कराड WALMIK KARAD यांनी पंकजाताई मुंडे यांच्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली होती. वाल्मीकअण्णा कराड यांनी केलेल्या राजकीय व्युव्हरचनेमुळेच पंकजाताई विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचल्या होत्या. त्यामुळे वाल्मीकअण्णा नेमकी काय चीज आहे हे या निमित्ताने जिल्ह्याला समजले होते. राजकीय मॅनेजमेंटमध्ये आज तरी कोणी वाल्मीकअण्णा यांचा हात धरू शकत नाही, असे बोलले जाते. जिल्ह्याच्या कुठल्याही काना कोपर्‍यात जा गेल्या चार साडेचार वर्षात वाल्मीकअण्णांनी परळीबाहेर जावून अनेक माणसं उभी केलीत. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे असले तरी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासनावर वाल्मीकअण्णा कराड यांची मजबूत पकड आहे. पालकमंत्री मुंडे यांनीच त्यांना तशी मोकळीक दिलेली आहे. त्यामुळे परळीत जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात बसून वाल्मिकआण्णा दिवसभर जनतेच्या प्रश्नावर काम करतात. वाल्मिकआण्णा परळीतून समांतर प्रशासन चालवतात हा आरोपही विरोधक त्यांच्यावर करतात. हल्ली नेत्यांनी जनता दरबार भरवला म्हणजे त्यांना जनतेचा मोठा पाठींबा आहे असा प्रचार आणि प्रसार केला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षापासून वाल्मीकआण्णांपुढे दररोज जनता दरबार भरलेला असतो. दर दिवशी कमीत कमी 1000-1200 लोक आपली कामे घेऊन त्यांच्याकडे आलेली असतात. वाल्मीकआण्णा देखील कोणाला निराश करीत नाहीत. आलेल्या लोकांचे काम जागेवर होईल यासाठी प्रयत्न करत असतात. सणोत्सव, सप्ताह, गणेशोत्सव, विविध महापुरूषांच्या जयंतीत्सोवात देणगी द्यावी लागेल म्हणून अनेक पुढारी गायब असतात. पण एकमेव वाल्मीकआण्णा असतील जे दोन दोन दिवस सढळ हाताने देणगी वाटत बसलेले असतात. जिल्ह्यात कुठे सप्ताह असो अन् त्या गावची लोक वाल्मीकआण्णांकडे भेटायला आलेली असूद्यात. वाल्मीकआण्णाच्या तोंडातून त्यावेळी सहज शब्द बाहेर पडतो, ‘100 पोते साखर अन् 100 तेल डबे पाठवून देतो’. यावरून त्यांच्या जिल्ह्यातील लोकप्रियतेचा अंदाज येतो. या सगळ्या कारणांमुळे वाल्मीकआण्णा कराड यांची आष्टी मतदारसंघात मोठी क्रेझ निर्माण झालेली आहे. आष्टी विधानसभेची जातीय गणितं जेंव्हा जेंव्हा मांडली जातात त्या प्रत्येकवेळी आष्टी मतदार संघातून वाल्मीकअण्णा कराड यांनी निवडणूक लढवावी अशी साद सोशल मीडियावरून कार्यकर्ते घालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यात केवळ वंजारा, ओबीसीचे लोक नाहीत तर मराठा समाजातील कार्यकर्तेही याच चर्चा करताना दिसत आहेत. आता वाल्मीकअण्णा खरेच आष्टी येथून निवडणूक लढवणार का? त्यांचा स्वभाव पाहता त्यांना खरेच तशी आमदार होण्याची इच्छा आहे का? की प्रेमापोटी कार्यकर्ते तशी चर्चा करत आहेत हे येणार्‍या काळात दिसेल. पण वाल्मीकअण्णाच्या आष्टी मतदार संघातील नुसत्या चर्चेने अनेकांचे इंडीकेटर लागले आहेत. जर या चर्चा खर्‍या ठरल्या तर आष्टीची जागा वाल्मीकअण्णा कराड यांनी खिशात घातलीच म्हणून समजा!

भीमराव धोंडेचे कार्यकर्ते अद्याप शांत
माजी आमदार भीमराव धोंडे BHIMRAO DHONDE हे भाजपात आहेत. परंतु भाजपकडून सुरेश धस यांचे नाव पुढे आलेले आहे. त्यामुळे धोंडे यांना संधी दुरापास्त आहे. परंतु धोंडे यांनी वेगळा निर्णय घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर ओबीसी म्हणून त्यांना मतदार संघात प्रतिसाद मिळू शकतो. धोंडे याच्याकडे हक्काची व्होटबँक आहे. सुरेश धस यांच्या विरोधातील मतदारांना ते चांगला पर्याय वाटतात. धोंडे 1980, 1985, 1990, 2014 असे चार टर्म विधान सभेवर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षापासून ते नको त्या चर्चेत सातत्याने आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा झाला आहे.

पंकजाताई मुंडे यांचा इशारा महत्वाचा
आष्टी मतदार संघात पंकजाताई मुंडे यांची मोठी क्रेझ आहे. पंकजाताई मुंडे यांचा एक इशारा इथली राजकीय गणिते बदलवून टाकू शकतात. लोकसभेत घसरलेली लीड पाहता पंकजाताई आष्टीसाठी पक्षापलीकडे जाऊन वेगळा विचार करू शकतात.

कार्यारंभला काय वाटते?
मतदार संघातील राजकीय चर्चा, विविध जाती धर्माची गणितं, पाहता इथून प्रमुख पक्षाच्या ओबीसी उमेदवाराला मोठी संधी आहे. महायुतीच्या जागा वाटपात सुरेश धस यांची संधी गेली तर धस हे शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील निवडणूक लढवायला कमी करणार नाहीत. शरद पवारांचा पक्ष देखील अशावेळी सुरेश धस यांना जवळ घेऊन चोंबाळेल. सुरेश धस असोत किंवा शरद पवार असोत दोघेही राजकीय संधीचा धूर्तपणे फायदा करून घेण्यात पटाईत आहेत. अशावेळी कितीही जवळचे महेबूब असले तरी पक्षाकडून त्यांची कुर्बानी होते. याशिवाय धस आणि आजबे यांच्यात 2019 मध्ये पडद्याआडून नेमकी काय डील झाली होती यावर देखील काही गणितं ठरतील. राहीला विषय वाल्मीकआण्णा कराड यांचा तर ते निवडणूक लढवतील अशी शक्यता वाटत नाही. रोजच्या जनता दरबारातून लोकांची कामे मार्गी लावण्यात त्यांना जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा इंटरेस्ट आमदार होऊन सभागृहात बोलण्यात नाही, असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. त्यांना शरद पवारांच्या पक्षात घेऊन जाण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण कितीही मोठं पद द्या, नाहीतर मंत्री करा, मी धनुभाऊंना सोडू शकत नाही असे निरोप त्यांनी उलट टपाली पाठवले होते. तेव्हा शरद पवारही खासगीत वाल्मीकआण्णांबद्दल बोलताना त्यांचा उल्लेख ‘स्वामीभक्त’ असा करतात.