MUSHAKRAJ

मुषकराज भाग 10 : जिल्हा कचेरीवर मोर्चा

बीड राजकारण संपादकीय

बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898

जिल्ह्याचे मुख्य बॉस चाहूल रेषावार साहेबांसोबत आज बाप्पांना मिटींग करायची होती. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मुषकाने जिल्ह्याच्या बॉसचा 8788998*** हा क्रमांक फिरवला.
मुषक ः (मोबाईल कानाला लावून) कोविड नाईंटीनसे इसवक्त पुरा देश लड रहा है… ऐसे मे घरोसे बाहर ना निकले… जब जरूरी हो तो अपने नाक, हात, मास्कके स्वच्छता का पालन करे, सोशल डिस्टंन्सिंग क ध्यान रखेऽऽऽ …………….. (फोन कट होतो.)
बाप्पा ः अरे काय झालं रेऽऽ चाहूल रेषावारांनी दिली का वेळऽऽऽ
मुषक ः काय सांगू बाप्पा सकाळी उठल्यापासून फोन करतोयऽ पण हा पठ्ठ्या फोनच रिसिव्ह करीत नाही. तिकडून नुसता मेसेज येतोय. प्लिज टेक्स्ट. टेक्स्ट मेसेज केला की हा पठ्ठ्या येसऽऽ नोऽ येसऽऽ नोऽ इतकाच रिप्लाय देतोय… त्यांना सांगितलं बाप्पा येणारंयत… तरीबी येस नो येस नो असलंच चालुयेऽऽ या म्हणतो की नाही काहीच कळत नाहीये…
बाप्पा ः अस्सं चल मग आपण आता तसंच निघू
(बाप्पा मुषकाच्या पाठीवर बसतात. अन् दोघे जिल्हा कचेरीच्या गेटवर धडकतात… सकाळी 10ः30 ची वेळ झालेली असते. तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो… नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी… आमचा नवरा घरी आलाच पाहीजे… कोविड योध्याचा सन्मान झालाच पाहिजे)
मुषक ः बाप्पा पाठीमागून मोर्चा येतोय कसलातरी…
बाप्पा ः हा कसला मोर्चा? अन् या कोरोनाच्या काळात? असा कुठला मोठा पेचप्रसंग जिल्ह्यावर येऊन ठेपलाय?
मुषक ः बाप्पा महिला संतप्त झाल्यात. आमच्या नवर्‍यांची मुक्तता करा, असे मागणीचे फलक घेऊन त्या इकडे निघाल्यात…
(मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकतो. बाजुला उभे राहीलेले बाप्पा महिलांच्या नजरेस पडतात)
एक महिला ः बाप्पाऽऽ कसंही करून आमच्या नवर्‍याला इथून सोडवा होऽऽ
बाप्पा ः काय झालंय तुमच्या नवर्‍याला, काही कळेल का? त्याला कुणी बांधून वैगेरे ठेवलंय का?
दुसरी महिला ः अहो काय म्हणून सांगूऽऽ? मागच्या पाच महिन्यापासून नवर्‍याला माझ्या घर दिसना, दार दिसना.., लेकरं दिसनात…बायकू दिसना…, उठलं की सुठलं जी साहेबऽ येस साहेबऽ आलोच साहेबऽ करतो साहेबऽऽ, झोपत नाही की जेवत नाहीऽऽ, पाणी पित नाही की चहा घेत नाहीऽऽ रातच्याला कवाबी येतो अन् पहाटंच कवाबी जातो… ह्याला काय संसार म्हणायचा का?
तिसरी महिला ः अहो बाप्पा माझा तर नवरा पार येडा झालाय… जेवा म्हटलं तरी म्हणतो आजचा आदेश आलाय काय? झोपा म्हटलं तरी म्हणतो आदेश आलाय का? रात्रीच दोन अडीचला आलाऽऽ आलाऽऽऽ आलाऽऽऽऽ म्हणून गल्लीभर पळत सुटतंय. अख्खी गल्ली जागी करतंय…
चौथी महिला ः अहो हे तर काहीच नाही.., माझा नवरा तर घरात आला की ह्या दाराला पत्रं ठोकील त्या दाराला पत्रं ठोकील… ही रूम कंटेन्मेट ती रूम कंटेन्मेंट असलंच काही बाही करतोय….
पाचवी महिला ः अहो हे तर काहीच नाहीऽऽ माझा नवरा तर कुणाला तरी किराणा द्यायला गेला तवापासून अख्ख्या गल्लीतून फोन सुरु झालेत. आमच्या घरी तेल संपलंय कुणी म्हणतंय मीठ संपलंय… ते कलेक्टर ऑफिसमधी काम करतेत की किराणा दुकानावर हेच समजना…
सहावी महिला ः आता हे सगळं बास झालं… त्याला म्हणावं निदान घटस्फोटाच्या अर्जावर तरी सही करायला घरी या… का तेवढी पण सुटी देत नाही तुमचा बॉस..?
बाप्पा ः हे माता भगिनींनो तुमची परिस्थिती अन् तुमची मनस्थिती आता माझ्या लक्षात आली आहे. मी आतमध्ये जाऊन रेषावर साहेबांना तुमच्यावर काय बेतली हे सांगणार आहे. त्यामुळे यातून नक्की मार्ग निघेल. तुम्ही चिंता करू नका…
(मुषकाला घेऊन बाप्पा चाहूल रेषावार साहेबांच्या केबीनमध्ये जातात. तिथे एका क्लार्कला साहेब कसल्या तरी कागदावर खूणा करून देत होते, इथे दुसरा उकार दे… इथं क्वॉमा दे, इथं पहिली वेलांटी.., इथं पहिला उकारऽऽ सांगत टाईप झालेला कागद लाल करून टाकला होता. तेवढ्यात त्यांची नजर दाराकडे जाते.)
चाहूल रेषावार ः (नाकातून आवाज काढत) यां बाप्पा यां, कसं येणं केलं?
बाप्पा ः अहो काय हे आमचा मुषक तुम्हाला फोन लावतोय तर तुम्ही सारखं टेक्ट करा टेक्स्ट करा काय लावलंय… कधी मधी फोन पण घेत जावा…
चाहूल रेषावार ः सॉरी बाप्पा, तुम्ही बाप्पा येणार हे माहितंच नव्हतं. इथं अनेक बाप्पा, दादा, मामा, काका, भैय्या, भाऊ, जिजा, अण्णा आहेत. मला वाटलं त्यातलेच कुणी बाप्पा येत असतील…
बाप्पा ः बरं ते सोडा बाहेर काही महिला आल्यात. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या नवर्‍यांना सोडाऽऽ अहो ह्या काय ड्युट्या झाल्या का? तुम्ही तर तुम्ही नाही, पण निदान कर्मचार्‍यांना तरी घरी सोडत जा…
चाहूल रेषावार ः हो बाप्पाऽऽ
(बाप्पा अन् चाहूल रेषावार यांच्यात इकडच्या तिकडच्या बर्‍याच गप्पा होतात अन् थोडावेळाने बाप्पा रेषावर साहेबांचा निरोप घेतात.)
मुषक ः (केबीन बाहेर आल्यावर) तुम्हाला वाटतं का तुम्ही सांगितलेली कामं 100 टक्के होतील?
बाप्पा ः होऽऽ तरऽऽ
मुषक ः मला नाही वाटतऽऽऽ
बाप्पा ः मी सांगतोय म्हणजे 100 टक्के करावंच लागणार
मुषक ः तुमच्या सारखंच सगळे लोकप्रतिनिधी सांगतेत. पण साहेबांचा पेन जरा वाकडाच चालतो… आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या ज्यांच्या बायकांची निवेदनावर नावे त्या त्या कर्मचार्‍यांची ते बदली करून लांब टाकणारऽऽऽ असं नाही झालं तर तुमच्या टंगडीखालून जायला तयारंय मी…
(थोड्याचवेळात जिल्हा प्रशासनातील बदल्यांची यादी बाप्पांच्या व्हॉटसअ‍ॅपवर येते. ज्यांनी ज्यांनी शिफारशी केल्या, त्या सर्वांना त्यांनी लांबचा रस्ता दाखविलेला असतो. अगदी बाप्पांनी मघाशी यादी दिलेल्या बायकांच्या नवर्‍यांनाही त्यांनी दूर फेकलेले असते.)
बाप्पा ः ह्यो माणूस जरा हेकडच दिस्तोय…
मुषक ः हेकड नाही, तुमच्या सोंडीसारखाच वाकडा तिकडा विचार करणाराय… तुम्ही शिफारस केली म्हणजे चांगलीच असणार ना? पण ह्यांनी तुमचाच काही इंट्रेस असा संशय घेऊन त्याला दूर फेकलं… त्यामुळं ह्यांना कधीकधी उल्टं सांगावं लागतं. तेव्हा आपलं काम सुल्टं होतं. आता ह्या यादीतच बघा ना, ज्यांना गेवराई पाहिजे त्यांनी मुद्दाम आष्टी मागीतले. ह्यांनी त्याला गेवराईला टाकले… हे ज्याला कळलं त्याचा फायदा… बाकीच्यांना बसावं लागणार डोकं खाजवित…

मागील सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

मुषकराज भाग 6 : थर्मल गन

मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक

मुषकराज भाग 8 : बारश्याचा कार्यक्रम

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा

Tagged