ramesh pokale- satish chavhan

सतीश चव्हाणांनी बारा वर्षातील बारा चांगली कामं दाखवावीत -रमेश पोकळे

न्यूज ऑफ द डे राजकारण

बीड, दि.19 : माझ्या राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेली आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न मी आमदार नसतानाही सोडवलेले आहेत. पदवीधरांचे नाव घेऊन विद्यमान आ.सतीश चव्हाण यांनी 12 वर्ष या मतदारसंघावर राज्य केलं. त्यांनी 12 वर्षातील 12 चांगली कामे आम्हाला दाखवावीत, असे आव्हान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी दिले आहे.

बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पोकळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सतीश चव्हाणांकडे पैसा आहे पण पदवीधरांच्या प्रश्नांची जाण नाही. निवडणूक आली की पदवीधरांच्या खानावळी दिल्या की मतदान होत नाही. पदवीधरांना कायम विकत घेतल्याचं समजून त्यांनी बारा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. बारा वर्षात सतीश चव्हाण यांनी विधानभवनाच्या पायर्‍यावर बसून फोटोसेशन करण्याशिवाय इतर काहीही काम केलेले नाही. खोटा कार्यवृत्तांत पदवीधरांच्या हाती दिलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही. तेव्हा ते आता मतदान मागताना जातीचा आधार घेऊन मत मागत आहेत. मागील अनेक वर्षात मी पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. 32500 पदव्यांचं घरपोहोच वाटप केले आहे. विद्यापीठाच्या सिनेटमध्ये काम केल्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे मी पदवीधरांना कामाच्या जोरावर मत मागत आहे, असेही रमेश पोकळे म्हणाले.

भाजपच्या उमेदवाराला कोणी ओळखतच नाही
भाजपने जो उमेदवार दिला आहे त्या उमेदवाराचं पदवीधरांच्या प्रश्नावर एकतरी काम आहे का? आम्ही पक्षाकडे काम करणार्‍या उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांचे ऐकले नाही. साधे विचारातही घेतले नाही. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला.

पंकजाताई या मुंडे भक्ताबरोबर
भाजपाकडून आमच्या नेतृत्वावर देखील अन्याय होत आहे. ज्यांनी पार्टी वाढवली त्यांनाच दुर्लक्षीत केले जात आहे. भाजपच्या शिरीष बोराळकरांना कोणीच अधिकृत उमेदवार मानत नाही. सगळे मलाच भाजपचा उमेदवार मानत आहेत. पंकजाताई मुंडे ह्या पदवीधर निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्च्या भक्ताबरोबर असतील, असा विश्वासही पोकळे यांनी व्यक्त केला.

तुला आमदार करणारच
मागच्या निवडणुकीतही माझ्यावर अन्याय झाला होता. तेव्हा स्व.मुंडे साहेबांनी मला माघार घ्यायला लावली होती. त्यांचा शब्द मी प्रमाण मानत 2014 च्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यावेळीच मुंडे साहेब मला म्हणाले होते तुला मी आमदार करणारच! आज मुंडे साहेब असते तर तेच माझ्या प्रचारात उतरले असते, असेही पोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

3 तारखेला सर्जिकल स्टाइक
राष्ट्रवादीत सतीश चव्हाण यांच्या विरोधात मोठी नाराजी आहे. तशीच नाराजी बोराळकर यांच्या उमेदवारीला आहे. मी एक सामान्य घरातील चळवळीतील कार्यकर्ता आहे. येत्या 3 तारखेला निकाल हाती येतील तेव्हा मी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारावर सर्जिकल स्ट्राईक केलेले असेल, असेही रमेश पोकळे म्हणाले.

Tagged