Site icon कार्यारंभ लाईव्ह

पुरग्रस्त भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने-सामने

uddhav thakare-devendra fadnavis

कोल्हापूर ः पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरी येथील कुंभार गल्ली येथे अचानक योगायोगाने समोरासमोर आले. काही क्षण त्यांनी संवादही साधला. दोघांच्याही या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.



मुख्यमंत्री ठाकरे सकाळी कोल्हापुरात पोहोचले. शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्तांशी संवाद साधून ते थेट शहरातील शाहूपुरी भागात आले. त्याच वेळी तेथे माजी मुख्यमंत्री फडणवीस हे पूरग्रस्तांशी संवाद साधत होते. फडणवीस काल रात्रीच येथे मुक्कामाला आले आहेत. सकाळी चिखली येथे संवाद साधून ते शाहूपुरीत आले. ते पूरग्रस्तांशी संवाद साधत असतानाच मुख्यमंत्रीही योगायोगाने तेथे आले. एकाच वेळी राज्याचे दोन्ही नेते एकाच गल्लीत आमने सामने आले. त्यामुळे योगायोगाने घडलेल्या या घटनेने राजकीय उत्सुकता वाढली. दोघांनी एकमेकांना न टाळता समोर येऊन संवाद साधला. देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. महाड, चिपळूणनंतर ते आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील त्यांच्यासोबत आहेत. पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या दोघांनीही सरकारच्या कारभारवर आसूड ओढले आहेत. आजही फडणवीस यांनी, राज्य सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का देत नाही, असं म्हणत सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर काही वेळातच हे दोन्ही नेते पूरग्रस्तांच्या भेटीच्या निमित्ताने अचानक एकमेकांसमोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, दोन्ही नेते एकत्र आल्याने आणि पूरग्रस्तांना आपल्या व्यथा सांगण्याची घाई असल्यामुळे या परिसरात मोठी गर्दी झाली होती. लोक थेट राज्यकर्त्यांना बोलून आपला संताप व्यक्त करीत असल्याचे चित्र पुरग्रस्त भागात आहे.

Exit mobile version