Site icon कार्यारंभ लाईव्ह

संयम आणि निष्ठा ठेवली की संधी मिळतेच; पंकजाताईंनाही संधी मिळेल

pankaja munde-chandrakant patil

pankaja munde-chandrakant patil

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

बीड, दि. 21 : विधानसभेचं तिकिट नाकारल्यापासून अनेक दिवस पक्षापासून बाहेर राहीलेले माजी मंत्री विनोद तावडे यांना पक्षाने आज पुन्हा एकदा नव्याने संधी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. संयम आणि निष्ठा ठेवली की भाजपमध्ये संधी मिळते. पंकजाताईंना देखील संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.


भाजपचे नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना संधी देण्याबद्दल भाष्य केलं. विनोद तावडे यांना संधी देण्यात आली. याचा मला मनापासून आनंद आहे. संयम आणि निष्ठा ठेवली की पुन्हा संधी मिळतेच. पंकजा मुंडे यांनी जे विधान केले. त्याचा माध्यमे अर्थ लावतात, तसं काही नाही. त्यांना संघटनेची जबाबदारी आहे. चुकीचा अर्थ लावू नका. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. पंकजाताईंना संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, असं पाटील म्हणाले.


‘शिवसेना आमच्यापासून दूर गेल्यानंतर आमचं हिंदुत्व काही कमी झालं नाही. सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा आम्ही सभागृह बंद पाडले. सेना-भाजप एकत्र असताना हिंदुत्वावर आघात झाल्यावर बाळासाहेब कडाडून हल्ला करायचे, त्यातून अनेकांची हिंमत व्हायची नाही. पण म्हणून काही बिघडलं नाही. आम्ही आमचं मिशन रक्तातच ठेवलंय’ अशी टीकाही पाटलांनी शिवसेनेवर केली. सावरकरांवर जहरी टीका झाल्यावर सेना आता रिऍक्ट झालेली दिसत नाही. जयंती-पुण्यतिथीला ट्विटही नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा लागू झाली आहे. त्यांच्याबरोबर सरकार करायचं म्हणजे तसं चालावा लागणार, असा टोलाही पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

‘संयम बाळगल्यास संधी मिळते मी त्याचं उदाहरण – विनोद तावडे

राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाचे आणि सर्व वरिष्ठांचे आभार आहे. यापदावर अधिक सक्रीय राहून मला काम करता येईल. या संधीचा पूरेपूर वापर करणार. महाराष्ट्रात अशी संधी मिळणारे कमी लोक आहेत. यात मला संधी मिळाल्यानं त्याचा चांगला वापर करणार, असं तावडे म्हणाले. मला जेव्हा तिकीट नाकारलं गेलं तेव्हा मी म्हटलं होतं की, त्यापूर्वी मला महत्वाची पदं दिली गेली, चांगलं खातंही मिळालं होतं. जी जबाबदारी पक्ष देईल ती मी घेतली. मला तिकीट नाकारलं गेलं तेव्हा मीच माझ्याजागी ज्याला उमेदवारी मिळाली त्याचा फॉर्म मी भरायला गेलो होतो. तेव्हापासून ते आज राष्ट्रीय सरचिटणीस पद हा प्रवासच बराच बोलका आहे, पंकजाताईंकडेही महत्वातं पद आहे. भाजपमध्ये संयम बाळगल्यास संधी कशी मिळते याकरता माझं उदाहरण बोलकं आहे, असं तावडे म्हणाले.

Exit mobile version