Site icon कार्यारंभ लाईव्ह

तांबाराजुरीत बिबट्याचे दर्शन!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तांबाराजुरी दि.29 : पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावात रविवारी (दि.29) सकाळी 10 च्या सुमारास तांबाराजुरी-चुंबळी फाटा मार्गावरील सरकारी विहिरीजवळ बिबट्या दिसून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
       तांबाराजुरीपासून 500 मीटर अंतरावर सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीच्या शेजारी एक बंधारा असून या बंधार्‍यावर कपडे धुणार्‍या तरुणीस बिबट्या दिसला. कपडे धुणे सुरु असताना बिबट्या दिसताच तरुणीने गावाकडे धुम ठोकली. त्यांनतर गावातील तरुणांनी बंधार्‍याकडे धाव घेतली. यावेळी शेतातून बिबट्या जाताना त्यांना दिसला. या बाबत वनविभागास माहिती दिली असून उशीरापर्यंत त्या ठिकाणी कुणीही पोहचले नव्हते. बिबट्याचे दर्शन झाल्याने तांबाराजुरीसह परिसरातील गावे दहशतीखाली आले आहेत. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Exit mobile version