बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलगा ठार

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा शिरूर

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण

शिरूर कासार : आष्टी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील एका शेतकर्‍याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची व शिरूर कासार तालुक्यातील महिलेवर हल्ल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी बिबट्याने एका 10 वर्षीय बालकावर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. किन्ही (ता.आष्टी) येथे ही घटना घडली.

  स्वराज सुनील भापकर (रा.भापकरवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे त्या बालकाचे नाव आहे. तो आईसह आजोळी आलेला होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तो नातेवाईकांसोबत शेतात गेलेला होता, नातेवाईक पिकाला पाणी देत असताना अचानक बिबट्याने स्वराजवर हल्ला केला, त्याला तोंडात पकडून काही अंतरावर नेऊन ठार केले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यात बिबट्या दिसला, अशा चर्चांना उधाण आले असून आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tagged