PANKAJA MUNDE

धर्मयुध्द टळण्यासाठी माझं ऐका!

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

“कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी वरळीची ही जागा पुरणार नाही. मला पदाची लालसा नाही. मला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी संपणार नाही. ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय हे मी कधीही म्हटलं नव्हतं. पण काही जण म्हणतात की, मला पंतप्रधान व्हायचंय.. ते चालतं का?’ असा सवाल पंकजाताई मुंडे यांनी केला आहे.

भाजपात महाभारत!

पंकजाताईंकडून विरोधकांना कौरवांवांची उपमा

फडणवीसांना नेता मानण्यास नकार

कार्यकर्त्यांना साद घालत
कठोर निर्णयाचे संकेत

ज्या दिवशी छत अंगावर
पडेल त्या दिवशी बघू…

बीड/मुंबई : ‘मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठं असणार्‍या व्यक्तींचा अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. मी सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात. मला अनेकजण हे करा ते करा असे सांगत असतात. पण हा पक्ष म्हणजे माझं घर आहे. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू, अशी रोखठोक भूमिका पंकजाताई मुंडे यांनी मांडली.

वरळीत जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना अतिशय आक्रमकपणे पंकजाताई यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. मात्र भविष्यातील अनेक राजकीय वक्तव्य देखील मुंडे यांनी केल्याने त्या अनुषंगाने आता चर्चा सुरु झाल्या आहेत.यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, माझा नेता मोदी माझा नेता अमित शाह, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी चांगलं आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपाने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणं शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचं नाव आलं, काय बिघडलं? मी कोण आहे तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला समजवण्याचा प्रयत्न करू नका”, असेही पंकजाताई म्हणाल्या.


पक्षातील आपल्या विरोधकांचे नाव न घेता पंकजाताईंनी त्यांना कौरवांची उपमा दिली. त्या म्हणाल्या, कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नसतील. काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहर्‍यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा. मला काय मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात. काही लोकांनी असं भाष्य केलं की, पक्षाने दिलेलं विसरणार नाही. नेत्यांचे कान भरून मोठं होणारी मी नाही. मला दिलं. चंद्रकांत पाटील महसूलमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. आशिष शेलारांनीही चांगलं वक्तव्य केलं. मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात, अशी भूमिका पंकजाताईंनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.


त्या म्हणाल्या, आपल्या जीवनातील स्पिरीट असंच ठेवा. मी न बोलताही तुम्हाला कळलं. तुमचंही मला कळलेलं आहे. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला संधी मिळाली असती, तर मी भागवत कराड यांच्या शपथविधीलाही गेले असते. ऊसाच्या फडात काम करणार्‍या माणसाला सभापती बनवलेलं आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला हे महत्त्वाचं आहे. गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान वाटतो. वंचितांचा वाली बनण्याचं आपलं स्वप्न आहे. इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी काय करायचं ते बघू, असं म्हणत त्यांनी थेट भाजपला इशारा देऊन टाकला आहे. शिवाय मी राष्ट्रीय राजकारणात असून माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आहेत असे सांगत त्यांनी आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम करण्यास देखील स्पष्ट विरोध असल्याचे दिसत आहे.

राजीनामे केले नामंजूर
लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. तुमची सगळ्यांची नाराजी मला समजू शकते. माझ्या डोळ्यात पाणी आले म्हणून तुम्ही राजीनामे दिले. पण तुमच्या डोळ्यात पाणी आले तर मी जगू शकत नाही. पक्षानं दिलेलं मी लक्षात ठेवते परंतु न दिलेलं कार्यकर्ते लक्षात ठेवतात. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी बोलत असून आज मी तुमचे राजीनामे नामंजूर करीत आहेत. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होऊन मला राजकारण करायचे नाही, असेही पंकजाताई म्हणाल्या.

पंकजाताईंच्या भाषणाचा मतितार्थ…

  • पंकजाताईंनी आपल्या भाषणात धर्मयुद्ध, शल्य, कर्ण अशा अनेक उपमा दिलेल्या आहेत. हे महाभारत नक्की कोणत्या दिशेने चाललं आहे आणि पंकजाताईंना काय म्हणायचं आहे यातील काही गोष्टी अगदीच स्पष्ट आहेत. पंकजाताई या जरी असं म्हणत असतील की, माझं भांडण पक्षाशी नाही, मी नाराज नाही. पण दोन गोष्टीमधून चित्र स्पष्ट होतं.

  • एक म्हणजे पंकजाताई यावेळी असं म्हणाल्या की, माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. आज महाराष्ट्रात भाजपचे सर्वोच्च नेते कोण आहेत हे पंकजाताई यांनाही माहिती आहे आणि अवघ्या महाराष्ट्राला देखील ते ठावूकच आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे होता हे आता स्पष्टच आहे.

  • पंकजाताईंनी यावेळी सांगितलं की,‘मला शेवटच्या क्षणी कळवलं की, विधान परिषद देता येणार नाही.. मी थँक्यू म्हणाले आणि फोन ठेऊन दिला. नंतर मला वाटलं होतं की, राज्यसभा दिली जाईल पण भागवत कराडांना दिली. त्यामुळे मी वारंवार सामंजस्याची भूमिका घेतली आहे.’ म्हणजेच पंकजाताई यांना काही प्रमाणात पक्षाकडून आशा होती.

  • पंकजाताईंनी महाभारतातील जवळजवळ सर्वच उपमा यावेळी वापरल्या आहेत. बर्‍याचदा असं म्हटलं जातं की, पंकजाताई या थेटपणे बोलत नाहीत. पण आज त्यांनी अनेक गोष्टी थेटपणे मांडल्या आहेत.

  • यावेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या असं म्हणाल्या की, ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय हे मी कधीही म्हटलं नव्हतं. पण काही जण म्हणतात की, मला पंतप्रधान व्हायचंय.. ते चालतं का?’ असं म्हणताना पंकजाताई यांचा सूर अगदी टीपेला पोहचला होता. त्यामुळे पंकजाताई यांचा संपूर्ण रोख हा एका नेत्याकडेच होता का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही पंकजाताई यांच्या भाषणात मिळाली आहेत.

  • धर्मयुद्धाबाबत बोलताना पंकजाताई यांचा रोख थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल पण अर्थातच त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं नाही. पण आपल्याला पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष आगमी काळात पाहायला मिळू शकतो.

  • पंकजाताई यांनी आतापर्यंत आपली पक्षात कुचंबणा झाली असल्याचंच आपल्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असं असलं तरी आपण तात्काळ बंड करणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंकजाताई यांनी एक प्रकारे पक्षाला थेट इशारा दिला आहे.

  • सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत पंकजाताई या नक्कीच वाट पाहतील. तेव्हा जर त्यांचा विचार झाला नाही तर त्यापुढे त्या काय करतील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पंकजाताई यांनी आता दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे आणि आता पुढील घडामोडींची त्या वाट पाहत आहेत.
Tagged