Site icon कार्यारंभ लाईव्ह

बिबट्याच्या हल्ल्यात बापलेकाचा मृत्यू


पैठण तालुक्यात भीतीचे वातावरण

पैठण दि १७ : चंद्रकांत अंबिलवादे– पैठण तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.16) रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करत असलेल्या बापलेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील गावे दहशतीखाली आली आहेत.

अशोक मखाराम औटे (वय ५०) व मुलगा कृष्णा अशोक औटे (वय २५) ही दोघे शेतात काम करत होती. सोमवारी रात्री दोन वाजता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह पैठण पोलिसांनी आपेगावचे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश औटे, दीपक मोरे व ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या पंचवीस कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत शोध मोहीम सुरू आहे. आपेगाव परिसरात वन विभागाने पिंजरा लावला आहे. या घटनेचा वन विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून मयतवर अंत्यसंस्कार व नातेवाईकांना योग्य मदत शासनाच्या निर्णयानुसार करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा वनपाल बी.एस तांबे, तालुका वनपाल मनोज कांबळे यांनी दैनिक ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

नातेवाईकांचा आक्रोश
मयत बापलेकाचा मृतदेह बघून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने अपेगावावर शोककळा पसरली आहे. बिबट्या लवकर पकडावा अशी मागणी केली जात आहे.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
घटनेची माहिती मिळताच पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक छोटू सिंग गिरासे, रामकृष्ण सागडे, पोह. सुधीर ओहोळ, माळी, दुल्लत तर जिल्हा वन विभागाचे जिल्हा वनपाल बी.एस तांबे, तालुका वनपाल मनोज कांबळे यांनी पंचवीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.

पाचोड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील थेरगाव परिसरामध्ये काही दिवसापूर्वी असाच बिबट्या धुमाकूळ घालत होता. त्यास ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले होते. परंतु बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत करणाऱ्या ग्रामस्थांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल होत असल्याने या प्रकरणामुळे कोणीही पुढे येत नसल्याचा प्रकार समोर येत आहे.

Exit mobile version