bidkin attacked landaga

लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

30 मेंढ्यांचा मृत्यू; 15 जखमी

पैठण दि.19 : पैठण तालुक्यातील बिडकीनजवळ पेट्रोल पंपाच्या समोर गायरान जमिनीवर मेंढपाळाच्या कळपावर मंगळवार मध्यरात्री लांडग्यांनी अचानक हल्ला केला. यात तीस मेंढ्याचा मृत्यू झाला तर पंधरा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. जखमी मेंढ्या सुद्धा दगावण्याची शक्यता तालुका पशुवैद्यकीय अधिकारी वर्तवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पैठण- औरंगाबाद रोडवरील बिडकीन गावाजवळील रस्त्यालगत गायरान जमिनीवर पेट्रोल पंपाच्या बाजूला मेंढपाळ बाळू चिमाजी वाघमोडे (रा.दिंडीवाडी ता, शेवगाव जि.अहमदनगर) हा मेंढपाळ आपल्या 80 मेंढ्या घेऊन या परिसरात राहत होता. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक 15 ते 20 लांडग्याच्या टोळक्याने वस्तीवर बांधलेल्या मेंढ्यावर हल्ला केल्यामुळे या हल्ल्यात तीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 15, मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, माजी सरपंच अशोक धर्मे यांनी तत्काळ वनविभाग व पशुवैद्यकीय विभाग यांना घटनेची माहिती कळविली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव तांबे, वनपाल मनोज कांबळे, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त विभागाचे डॉ निवास भुजंग, पशुधन विकास अधिकारी डॉ.गौतम साळवे, डॉ महेश पवार, डॉ देविचंद थोरात, तलाठी ज्ञानेश्वर महालकर, वनरक्षक विश्वास साळवे, सचिन तळेकर, राजेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

मेंढपाळांचा व्यवसाय धोक्यात
दरम्यान कोरोना अनुषंगाने ग्रामीण भागातील स्थानिक गावांमध्ये मेंढपाळ हा व्यवसाय धोक्यात आला आहे. मेंढपाळांनी इतर गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आपला निवारा मोठ्या गावालगत निर्माण केला आहे. दोन दिवसापूर्वी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे अज्ञात चोरट्यांनी 22 मेंढ्या चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच बिडकीनमध्ये लांडग्यांनी हल्ला केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे मेंढीपाळ व्यवसाय धोक्यात आला आहे.

Tagged