‛कार्यारंभ’चा पाठपुरावा; आपत्ती व्यवस्थापन विभाग ‛अलर्ट’वर
बीड : माजलगाव धरणाच्या जवळच नदीपात्रात आजोबा व नातू अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात स्थानिकच्या बचाव पथकांना यश आले नसून बचाव कार्यादरम्यान पथकातील एक कर्मचारी पाण्यात अडकला. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुणे येथील एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
माजलगाव धरणाच्या गेटच्या पायथ्याजवळ देवखेडा येथील रामप्रसाद गोविंद कदम यांचा गोठा आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याचे त्यांच्या लक्षात न आल्याने ते तिथेच अडकून पडले. दुर्दैव म्हणजे त्यांच्या सोबत त्यांचा ७ वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हा देखील तिथेच अडकून पडला. त्यांनी एका बाभळीच्या झाडावर आश्रय घेतलेला आहे. दरम्यान, बचाव पथकातील फायरमन पवन कराड हे देखील बोट उलटल्यानंतर जवळच एका झाडावर अडकून पडले आहेत. परंतू, ते सुरक्षीत असून सकाळपर्यंत आम्ही त्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर आणू असा विश्वास पथकातील जवान सुनील आदोडे यांनी कार्यारंभशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, ‛कार्यारंभ’ने सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिरके यांनी पुणे येथील एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केले असून येत्या पाच ते सहा तासात पथके माजलगाव येथे दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर बचावकार्य सुरू होईल. सध्या प्रभारी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तर घटनास्थळी तहसीलदार वैशाली पाटील या ठाण मांडून आहेत. सोबत महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.