बीड, दि. 13 : मराठवाड्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत. इतर जिल्ह्यातील दुसरी लाट संपूर्णपणे ओसरली देखील पण बीडमध्ये मात्र कोरोनाचा आकडा 100 च्या खाली यायचे नाव घेत नाही. आता तर तो चक्क 225 पर्यंत पोहोचला होता. कोरोना विषाणू आटोक्यात न येण्याचं प्रमुख कारण म्हणजे राजकीय नेत्यांचे मोर्चे, आंदोलने, सभा, मेळावे हे आहे. हे कारण कुणाला माहिती नाही असे नाही, परंतु तरीही आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. शिवाय कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात कडक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा नेमक्या काय कडक उपाययोजना करतात पुर्वीसारखीच दुकानदारांची मान पिरगळतात की राजकीय नेत्यांचे कान पिळतात हे बघावं लागेल.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी प्रशासनाला सुचना देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत नसून निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्या कमी होत नाही. ग्रामीण व शहरी भागात कडक कारवाई होण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेचा धोका देशापुढे असून जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण होऊन देखील तिसरी लाट आली आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेपेक्षा यामध्ये जास्त रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासाठी पूर्वतयारी करताना केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या सूचना दिल्या असून संसर्गाच्या लाटे दरम्यान केंद्राकडून ऑक्सीजन उपलब्ध होऊ शकणार नाही. आपल्या बीड जिल्ह्यात देखील यादृष्टीने सध्या असलेल्या क्षमता वाढविण्यासाठी प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्प तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही ना.धनंजय मुंडे म्हणाले.
जिल्ह्यातील कोरोना लसीकरण परिस्थिती तसेच कृषी, भूसंपादन, महावितरण आदी विषयी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. याप्रसंगी पालकमंत्री श्री मुंडे बोलत होते. बैठकीसाठी आ. प्रकाशदादा सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ.संजयभाऊ दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थिती होते.
खाजगी रुग्णालयाचे ऑडिट…
कोविड उपचारांसाठी ज्या खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले योजना लागू करण्यात आली होती, तेथे मोफत उपचार झाले नसल्यास प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल आणि केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. हे ऑडिट तातडीने पूर्ण करून रुग्णालय निहाय लेखी स्वरूपात सादर करावेत असेही ना. मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.OkPrivacy policy