milind narwekar

मिलिंद नार्वेकरांमागे ईडी, सीबीआय, एनआयए लावण्याची धमकी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई, दि. 14 : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलींद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून या मागण्या पूर्ण न केल्यास तुमच्या पाठीमागे ईडी, सीबाआय, एनआयएची चौकशी लावू असा व्हॉटसअ‍ॅप मेसेज करीत धमकी दिली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार नोंदवली असून प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

नार्वेकर शिवसेनेचे सचिव असून ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत. ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणार्‍यांपैकी त्यांचं नाव आघाडीवर आहे. याबाबत एका अधिकार्‍यानं सांगितलं की, हा मेसेज करण्यासाठी ज्या नंबरचा वापर झाला आहे तो नंबर कुठल्यातरी अ‍ॅप्लिकेशनचा वापर करुन घेतलेला आहे ज्याला व्हर्चुअल नंबर असं देखील म्हणतात. आम्ही मोबाईल कंपन्यांकडे या नंबरविषयी माहिती मागवली आहे. या प्रकरणामागे नेमकं कोण आहे याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे.

गुरुवारी क्राईम ब्रांचच्या अँटी एक्टोर्शन सेलने तीन लोकांना अटक केली आहे. या तिघांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह यांना फोन करत ट्रान्सफर पोस्टिंगची मागणी केली होती. पुण्यात देखील शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैशांची मागणी केल्याचं समोर आलं होतं.

Tagged