बीड दि.22 : सध्या ऑनलाईन कुठल्याही अॅपद्वारे खरेदी, विक्रीचा प्रयोग केल्यानंतर फसवणूकीचे प्रकार घडत असल्याचे सततच्या गुन्ह्यावरुन उघडकीस येत आहे. किरायाचे वाहन हवे म्हणून एका वकिलाने जस्ट डायलला कॉल केला. त्यानंतर सायबर भामट्याने जाळ्यात ओढून 28 हजार रुपयांना चुना लावल्याची घटना 21 जुलै रोजी शहरात उघडकीस आली. यावरून शिवाजीनगर ठाण्यात अनोळखी भामट्यावर गुन्हा नोंद झाला.
महेश प्रल्हाद गडदे (रा. बंकटस्वामी नगर, कॅनॉल रोड, बीड, हमु. पोखरी रोड, अंबाजोगाई) असे फसवणूक झालेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांना बीडमधून घरातील सर्व साहित्य अंबाजोगाईला न्यायचे होते. पॅकर्स व मुव्हर्स सेवेसाठी त्यांनी जस्ट डायलवर 8 जुलै रोजी संपर्क केला. काही वेळाने त्यांना एका मोबाइलवरून कॉल आला. त्याने बेंगलोरच्या कंपनीतून बोलत असून, भारतभर सेवा देत असल्याचे सांगितले. साहित्य अंबाजोगाईला नेण्यासाठी 11 हजार 800 रुपये किरायाही ठरला होता. गडदे यांना त्याने चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाचे आरसी बुक पाठविले. त्यामुळे गडदे यांची खात्री पटली. सुरुवातीला त्याने सहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सर्वरडाऊन असल्याची सबब देत पूर्ण रक्कम एकाचवेळी पाठविण्यास सांगितले. वाहन मांजरसुंबा येथे आले असून, डिझेलसाठी 5 हजार 100 रुपये पाठवायला लावले. एकूण 28 हजार 700 रुपये उकळूनही त्याने वाहन पाठविले नाही. नंतर कॉलही उचलले नाहीत. फसवणूक झाल्याची बाब गडदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून केतन राठोड पुढील तपास करीत आहेत.