महानगरांमध्ये स्क्रॅप केलेले अ‍ॅटो बीडमध्ये सुसाट!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

खळबळजनक! एकाच क्रमांकाचे 11 अ‍ॅटोरिक्षा
बीड
दि.22 : बीडमध्ये काहीही चालतं.. ही मानसिकता अनेकांची झालेली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यात स्कॅ्रप (भंगारात काढलेले) झालेले अ‍ॅटो रिक्षा बीडमध्ये मात्र सुसाट धावताना दिसतात. ही बाब बीड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या अ‍ॅटो रिक्षांवर शुक्रवारी (दि.22) कारवाई केली. यावेळी 30 ते 35 अ‍ॅटो शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. यावेळी एकाच क्रमांकाचे तब्बल 11 अ‍ॅटो आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक करणारे अ‍ॅटो रिक्षा आहेत. यामध्ये अनेकजण नियमात उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेवून चालतात. तर अनेकजण कुठलेही नियम न पाळता, कागदपत्रं नसलेली अ‍ॅटो चालवतात. त्यामुळे नियमीत कर भरणार्‍या, परवानगी घेणार्‍या रिक्षा चालकांवर अन्याय होतो. अलीकडच्या काळात बोगस असणारी अ‍ॅटोची संख्या वाढली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक विघ्ने, पवन गायके, श्रीमती मोरे, भोसले यांच्यासह जिल्हा वाहतूक शाखेच्या टिमने शुक्रवारी शहरातील मोमीनपुरा, बार्शी नाका, माळीवेस, साठे चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागामध्ये विशेष माहिम राबवली. यामध्ये मुळ कागदपत्रं नसलेल्या अ‍ॅटो रिक्षांवर कारवाई करण्यात आली. 30 ते 35 अ‍ॅटो बीड शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. तर यावेळी 11 अ‍ॅटो रिक्षांचा एकच क्रमांक आढळून आला. सदरील रिक्षा चालकांनी मुळ कागदपत्रे सादर करावीत व दंड भरुन आपले वाहन घेवून जावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


भूमी मोटार्सचा परवाना
निलंबित असतानाही विक्री

शहरातील भूमी मोटर्सचा परवाना उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून निलंबित करण्यात आलेला आहे. तरीही अ‍ॅटो रिक्षाची विक्री केली जाते. त्याकडूनच एमएच-23 टीआर-0311 या एकाच क्रमांकाची अ‍ॅटो विक्री करण्यात आलेली आहेत. त्यातील 11 अ‍ॅटो जमा करण्यात आल्या आहेत.

प्रवाशी वाहतूकीसाठी
नियमात असलेली रिक्षा

शहरात प्रवाशी वाहतूकीसाठी एमएच 23-सी, एमएच-23 एन, एमएच-23 एआर या क्रमांकाच्या अ‍ॅटो चालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रवाशी वाहतूकीसाठी सर्व रितसर परवानगी घेतलेली आहे. तर एमएच-23 एक्स, एमएच-23 एच ही खाजगी रिक्षा असून त्यांनी रितसर परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या परवानगी नसलेल्या रिक्षांवरही लवकरच उपप्र्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.

Tagged