नवी दिल्ली, दि.1 : भारत आणि चीनमध्ये सद्य स्थितीत तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशाचे रणगाडे ऐकमेकांच्या आमनेसामने फायरिंग रेंजमध्ये उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे सीमेवर कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर हा तणाव निर्माण झाला आहे.
इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार चीनने घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर देत हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. सध्या दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु आहेत. पण तरीही दोन्ही देशाचे रणगाडे शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात केले असून ते भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे. यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ही चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चावर चर्चा होत असून दुसरीकडे चीनच्या कुरापती कमी व्हायला तयार नाहीत.