mushakraj

मुषकराज भाग 11 ः सोन्यावरील डिस्काऊंट

बीड

बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898

कुण्या एका ज्वेलर्सवाल्यानं हाळी पिटली… भव्य डिस्काऊंटऽऽ भव्य डिस्काउंटऽऽऽ हा आवाज कानी पडताच मुषकराज खडबडून जागे झालेऽऽ डोक्यात विचारचक्र सुरु झालंऽऽ. महागाईच्या काळात अन् लॉकडाऊनमध्येही सोन्यावर डिस्काउंट देणारा ह्यो गडी कोण? मुषकानं जरासा कानोसा घेतला तवा त्याच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यानं आज ठरवलं… बाप्पांचा पोलीस विभागातला दौरा रद्द करून त्यांना आज सुभाष रोड फिरवून आणायचा…
बाप्पा ः (आज बाप्पा पण मुषकाच्याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करीत होते.) अरं हिकडं कुठं? पोलीस विभाग तर हिकडं ना?
मुषक ः बाप्पा तुम्ही लैच भोळ्यावानी करता… तुम्हाला सगळं माहित अस्तानाबी तुम्हाला माझ्याच तोंडून वदवून घ्यायची इच्छा अस्ते. माझ्या मनात काय ईच्च्यार सुरुये, खरंच तुम्हाला माहिती नाही व्हयं? अन् तुमच्या ‘आदेशा-संदेशा’ बिगर मी तुम्हाला असा कसा कुठंबी घेऊन जाणार व्हंय?
बाप्पा ः बरं चल बाबा… आजचा दिवस तुझा… तू जिकडे म्हणून नेशील तिकडे आज जाणारऽऽऽ पण आज मला माझे पोलीस बांधव अन् दिनू-मंगू ह्या पोलीस दोस्तांची भेट घेतल्याबिगर माघारी नाय जायचं बग…
मुषक ः आता हे तुमचेबी दोस्त झाले का कायऽऽ? आधीच त्यांचा फुटूपुरता कुणासंगंबी दोस्ताना असतो… त्यात तुमचीबी भर पडली म्हणायचं का? चला उतरा बरं इथंऽऽ
बाप्पा ः आता मध्येच इथं कुठं उतरिवतो..?
मुषक ः तुम्ही म्हणे ना पोलीस दोस्ताला अन् पोलीस बांधवांना भेटायचं म्हणून…
बाप्पा ः होऽऽ मग इथं कुठं घेऊन आला?
मुषक ः अख्खं खातं तर इथचंय ना? ती बगा त्या लाल-पिवळ्या पाटीजवळ उभे असलेले तुमचे दोन दोस्त… अन् त्यांच्यासमोर असलेली भली मोठी रांग… कुठला अधिकारी पाहिजे तुमाला? शिपायापासून ते मोठ्या सायबांच्या शिपायापस्तोरऽऽ सगळे इथंच असतात… तुमाला तिकडं नेलं अस्त तरीबी तिथं कुणीच भेटलं नस्तं… हल्ली झाडून-पुसून सगळीजण इथंच असतात… कुणी सवता येतं तर कुणी आपल्या ‘खास’ शिपायांना पाठिवतं… तर कुणी येगयेगळ्या पथकामार्फत येऊन हिथल्या पावत्या फाडतं… इथल्या पावतीचा लैच ‘शुभ’ शकून हाय म्हणं..? हिथली पावती फाडली की कुणाचं बी नशिब फळफळलंच मनून समजा…
बाप्पा ः अस्संय व्हंय..? चल की मग आपुनबी एकाद दुसरी पावती फाडू
मुषक ः (रागात… सैराट मधील डायलॉग बोलतो) व्हा मागं.. व्हा मागं … मागं व्हा मागं… मराठीत सांगितलेलं कळत नाय व्हय… का इंग्रजीत सांगूऽऽ? इथं खाकीचा डरेस असल्याबिगर तुमाला कुणी उबाबी र्‍हावू देणार नाय… एकतर इथं खाकी, नायतर झ्याकी…
बाप्पा ः आता ही झ्याकी काय?
मुषक ः झ्याकी म्हंजी एकदम झलकी… एकाद्या हिरो-हिरोनीवनी… नायतर एकदम पांडरा शिपीट डरेस लागतोय… पुढार्‍यावनी… असलं गळ्यात उपरणं अन् हातात धोतराचा सोंगा धरून तुमी तिथं गेल्यावर त्यो दुकानदार तुमी केवड्याचे हेबी इच्चारत नाय… पण त्यान्ला नुस्तं समजाव की तुमी साक्षात गणपती बाप्पाय… मग बगा कसा पळत येतो… एकादा फुलाचा गुच्छ… दोन चार फुटूवाले… एकाद दुसरा बॉडीगार्ड… असला सगळा लवाजीमा मागं-पुढंच अस्तोय ह्याचा… घरी-दारी आशीर्वादाला ‘भरत’… त्यामुळं त्यो कुणालाच नाई ‘डरत’… शहरात कुणीबी अन् कसलाबी ‘हायफाय’ माणूस येऊ द्या… ह्याचा त्याच्यासंग एक फुटू असणार म्हंजी असणारच… मग साक्षात हीथल्या साहेबाचे मोठे साहेब आले तरी ह्यो माणूस गुच्छ द्यायला अन् फुटू घ्यायला अजिबात मागं हटत नाय…
बाप्पा ः त्याच्या ह्या कलेचा शोध घ्यायलाच पाह्यजे मग…
मुषक ः नुस्ता शोधच नाय तर ह्याचा सोक्षमोक्षपण लावला पाह्यजे. ह्याचं अन् पोलीसांचं अस्सं काय साटंलोटं हाय की हा कुणीबी मोठ्यातला मोठा गडी जिल्ह्यात आला की त्याला ह्यो भेटाय जाणार, ह्येच अधिकारी त्याची वळख करून देणार… ह्याच्याकडं डिस्काऊंटमधी द्यायला सोनं येतं कुठून? पोलीसांचीच इथं एवढी गर्दी का? प्रत्येक नवा आलेला अधिकारी ह्याचा एवढा भक्त का? बाप्पा एकपरीस तुम्हाला अधिकारी पुसणार नाईत… पण आलेला प्रत्येक अधिकारी ह्यांना हमखास पुसणार म्हंजी पुसणार…
बाप्पा ः चल आता इथून… सगळं लक्षात आलं माझ्या…
मुषक ः आताशी तुमी ‘पिवळं’ सोनं बघीतलं… अजून काळं सोनं दाखवायचंय तुम्हास्नी… ते सोनं अजिबात ‘ढवळं’ पडत नाय ह्याच्यासारखं…
बाप्पा ः चल मग आता इथून लवकर… आपल्याला आता वेळ कमी राहीलाय…
(मुषक अन् बाप्पा महामार्गावरच्या महालक्ष्मी चौकात येतात. इथं ‘काळ्या सोन्या’चे व्यापारी खाकी वर्दी घालून बसलेले असतात.)
बाप्पा ः इथंबी खाकीतलेच लोक रांगा लावून बसलेत..
मुषक ः इथं उभ्या राह्यलेल्या हरएक काळ्या-पांढर्‍या ‘हायफाय’ स्कार्पिओत खाकीचा माणूस हमखास दिसणार म्हंजी दिसणार… कुठल्यात ‘शानअप’ दिसणार, कुठल्यात ‘जायबाय’ बसणार… कुठल्यात काळी ‘साळवी’ माणसं असणार… इथं सगळं कलेक्शन गोळा होऊन मग गाडीचे येगयेगळे ‘कप्पे’ भरले जाणार… हा भरलेला कप्पा कुणाला ‘हर्ष’ देऊन जातो की नाय माहीत नाय पण ह्या व्यापार्‍यांसाठी ‘काळं सोनं’ खोदून आणायला कुठलाच (प) वार वर्ज्य नाही. अख्ख्या लॉकडाऊनमधी कुणी नाय पण ह्यांच्या गाड्या इकून तिकडं अन् तिकून हिकडं बूंग बूंग पळत व्हत्या…ह्यांच्याच गाड्यांची लॉकडाऊनमदी ‘ट्राफीक’ होत होती. आता हे सगळं सायबांना दिसत नसणार ह्यावर कोण मनून इश्वास ठेवील?
बाप्पा ः मुषका हे सगळं ऐकून आता मला गरगर होतंय… काय हे सगळं? पृथ्वीतलावर एक माणूस धड नाही?
मुषक ः बाप्पा… ह्या चौकातच एक हद्द संपली… दुसरी हद्द इथूनच पुढे सुरु झाली. त्याचं ऑपरेटींग घाटावरून व्हतंय…
बाप्पा ः आता तिथे काय काय असतंय?
मुषक ः तिथं तर लैच ‘नवल’ हाय. तुमच्या नावकर्‍यानंच तिथं उच्छाद मांडलाय… ‘भास्कर’ उगवत नाही तोच तिथं 18 श्याची कोरीखट नोट मोजल्या जाते. तिथं कितीबी द्या… कमीच पडतंय… एकबारीला त्या व्हिडिओतल्या बाईचा तंटा मिटन… पण इथला हिशोबाचा नाय मिटणार..?
बाप्पा ः हे अति होतंय अस्स नाय वाटत तुला?
मुषक ः ह्यातलं एक अक्षर बी खोटं निगालं तर पुन्हा मनुन तुमच्यासंगं ह्या पृथ्वीतलावर येणार नाय…
बाप्पा ः आता हे सगळं मोठ्या साहेबांच्या कानावर घालून मग निघायची तयारी करू आपण…
(बाप्पा अन् मुषक मोठ्या साहेबांच्या ‘योगेश्वरी’ जवळ येतात. अंगणात पडलेला ‘प्राजक्ता’चा सडा पाहून बाप्पांना भरून येतं. गेट उघडून पहातात तर मोठे साह्येब एका अजगराला गळ्यात घालून डॉगीसोबत खेळत खेळत अधून मधून घोड्यावर पण रपेट मारतात. थकल्यावर एका मोरापाशी बसून त्याला ‘सोनेरी’ ताटलीतला एकएक दाणा टाकतात. बाप्पा अन् मुषक कुणाला काहीएक कळू न देता तिथून आल्यापावली परत निघतात.)
समाप्त…
(टिप- हे सदर केवळ मनोरंजनासाठी होते. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा कुठल्याही जिवीत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

मागील सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

मुषकराज भाग 6 : थर्मल गन

मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक

मुषकराज भाग 8 : बारश्याचा कार्यक्रम

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा

मुषकराज भाग 10 : जिल्हा कचेरीवर मोर्चा

Tagged