राखेची वाहतूक करणारे हायवा महिलांनी अडवून चालकांना दिला चोप; रस्त्यावर सांडलेली राख चालकांकडून शर्टने घेतली पुसून

परळी बीड

गोपीनाथ गडावरील महिला आक्रमक


परळी- आज बीड जिल्ह्यात गोपीनाथ गडावरील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत राखेची वाहतूक करणारे हायवा अडवले. त्यातील चालकांना चपलेचा प्रसाद देत त्यांच्याकडून स्वतःचे शर्ट काढायला लावत रस्त्यावर सांडलेली राख पुसून घ्यायला लावली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल आहे.

अधिक माहिती अशी की, परळीचा औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वाहतुकीमुळे आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. घरात, दारात कुठेही राखच राख झाल्याने सगळ्याचं जगणं मुश्किल झाले आहे. राख वाहतूक करणारे हायवा राखेवर पाणी मारत नाहीत आणि झाकूनही नेत नाहीत त्यामुळे परळी- तेलगाव रोडवर नुसती राख दिसून येते. येथील गोपीनाथगडावर देखील अशीच राख पडत असल्याने आज सकाळीच महिला आक्रमक झाल्या. त्यांनी या ठिकाणावर ये जा करणारे सर्व हायवा अडवून त्यातील चालकांना चपलेने चोप दिला आणि त्यांना अंगातील शर्ट काढायला लावून रस्त्यावर सांडलेली राख भरायला लावली. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.