Site icon कार्यारंभ लाईव्ह

मुषकराज भाग -10 आंदोलनजीवी…

MUSHAKRAJ

MUSHAKRAJ

संपूर्ण जिल्ह्याची राजकीय खबरबात घेतल्यानंतर बाप्पांना येथील प्रशासनाचा आढावा घ्यायचा होता. परंतु बाहेरच गार्‍हाणी घेऊन सामान्य नागरिक, सामाजिक कायकर्ते ‘आंदोलनजीवी’ नागरिकांची मोठी रांग लागली होती. मग बाप्पांनी सगळ्याच अधिकार्‍यांना बाहेर बोलवत जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोरच उपोषण ओट्यावर बसून एकएकाचे निवदेन घेत गार्‍हाणी ऐकून घ्यायला सुरुवात केली. अर्थात पहिला नंबर लागला होता, लिंबागणेशच्या डॉक्टरचा…

बाप्पा : बोला नावकरी, गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद व्हायला अजून किती आंदोलन करणे बाकी आहेत तुमची..?

डॉ.गणेशराव : बैलगाडीभर पुरावे घेऊन आंदोलन करायची आम्हाला लै हौसंय व्हंय? घरात कागदं ठेवायला जागा नाही आता… आता तुमची विसर्जन मिरवणूक सुध्दा याच कागदावर बसून… प्रशासनात बसलेले अधिकारी म्हणजे नुसता ‘खायला काळ अन् भुईला भार’ आहेत. तुमच्या नावच्या जमीनी पण ह्यांनी वाटून खाव्यात का? ह्यांना देव कळंना, धर्म कळना, नुसता पैसा पैसा पैसा करायला लागलेत. अन आम्ही तक्रार केली की ज्या अधिकार्‍यानं ‘आघाव’पणा करून जमीनी विकल्या त्यालाच चौकशी अधिकारी म्हणून नेमलं जातंय… आरं हे प्रशासनंय का कोणय? ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असलं कुठपर्यंत चालणार? घोटाळेखोर दळभद्री अधिकार्‍यांनी चक्क एक जिल्हाधिकारी खाऊन टाकला… बिचार्‍याचा काहीच दोष नसतानी ह्यांची पापं त्यांच्या माथी पडले… नुसता ताप ताप ताप जगताप करून टाकलाय जिल्ह्याच्या सामान्य माणसांचा… बाप्पा तुम्हीच काही मार्ग काढा ह्यातून…

अ‍ॅड.अजित देशमुख : औऽऽऽ गणेशराव उरकाकी… दररोज तुमचंच आंदोलन, निवेदन, तक्रार ह्यामुळं आमच्या निवेदनाला प्रशासन हात पण लावंना झालंय… प्रशासनाला तुमची भाषा कळंत नाही… जरा माहिती अधिकार टाकून ह्यांना कोर्टात खेचत जा… ते म्हणतंय ‘रोज मरं त्याला कोण रडं’ त्यामुळं अधून मधून विश्रांती घेऊन महिन्याकाठी 2-4 आंदोलनं, तक्रारी तडीस नेत जा… त्यो पोस्टमन पण तुमच्या घरी चकरा मारून मारून बेजार झालाय… अन् प्रत्येक कार्यालयात दोघं जण फक्त तुमच्याच पत्राला उत्तरं द्यायच्या कामाला लागलेत… आपलं बघा कसंय आधीच कागदं जमवून चार पेप्रात बातम्या अन् लगेच निवेदन अन् लगेच कोर्ट… प्रशासन हातभर तर लांब सरकतंय कोर्टाचं नाव काढलं तरी… तुमच्यासारखेच मी पण बैलगाडीत कागदं आणले अस्ते पण मागच्याच लॉकडाऊनमध्ये त्यांना काडी लावून दिली. अन् मला गाडी नाही तर कंटेनर लागलं अस्तं. डॉक्टरासाहेब ते मंडीतले भाऊ मणतेत तसं कधी कधी तुरटी फिरवत जा… अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार सारखा सारखा ढवळत जाऊ नका…

रामनाथ खोड : (अ‍ॅड अजितराव देशमुख यांना उद्देशून) औऽऽ वकीलसाहेब तुमचं तुम्ही निवेदन द्या अन् बाजुला सरका… उगं कुणाला कशाला तुरट्या फिरवाय सांगताय..? माहिती अधिकार आम्हालाबी कळतूय… पण तुमच्या अंगावर काळा झबला असल्यानं तुमचा गूण जरा लौकर येतुय… डॉ.ढवळे अन् आमची आता कुठं सांगड लागलीय तर तुम्ही लगेच तुरटी फिरवाय सांगताय… बाप्पा हे घ्या आमचं निवेदन… बिंदुसरा काठावर आलेलं इघ्नं तुम्हालाच हरन करावं लागणारंय… देवा धर्माच्या जमीनीचं आता उघडं पडलं… पण मपली उभी जिंदगी देवाच्या जमीनीसाठी कुर्बान केलीय… नाय एकएकाच्या मागं शनि लावला तर नावाचा रामनाथ नाई…

राजाबाबू : चला चला… पुढं व्हा… माझ्या मागं नस्ती काम नका लावू… पटापट आटपा… मला बी परळीचा बंदोबस्तंय… पुन्हा पिस्तुल कुणी ठेवली त्याचा शोध घ्यायचाय हे वेगळंच… त्या कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं ह्या प्रश्ना इतकाच पिस्तुलीचा प्रश्न पण किचकट झालाय… दरोडेखोरांच्या टोळ्या पकडल्यावर आम्हाला मिरचीपुड जप्ती दाखवायची सवयच आहे. पण ह्या पिस्तुलचं कोडं काय उलगडलं नाही… अन् नायच उलगडलं तर तशीच फाईल बंद करून टाकायचा आदेशय…

मुषक : बघा बघा बाप्पा तुमचे राजाबाबू… जसं काय काम करून लै दमलेत… तुमाला ते सिंघममधल्या अजय देवगणचा डायलॉग आठवतोय का? त्ये नाई का बाजीराव सिंघम पोलीसांना म्हणत ‘अगर पुलीस चाहे तो कोई मंदिर के बाहर की चप्पल भी चुरा नई सकता’ असले दोन-तीन पिच्चर दाखवा की त्यांना… आली तर आली त्यांच्यात थोडी जान… नाय तर ते अनिल देशमुखाचं वाचत जा म्हणावं त्यांना अधून-मधून… त्ये बी बरं अस्तंय…

राधेश्याम (जिल्ह्याचे बॉस) : आरे काय हेऽऽऽ हा जिल्हाय का काययंऽऽ सगळे घोटाळेच घोटाळेऽऽऽ एकाचा घोटाळा दाबायला जावं तर दुसर्‍याचा उचकटतंय… दुसर्‍याचा दाबाव तर तिसर्‍याचा पुढं येतंय… त्या अफगाणिस्तावाल्यांनी आपल्याकडं किती सैन्यंय याचा जसा शेवटपर्यंत अमेरिकेला मेळ लागू दिला नाई तसा आणखी मलाबी इथला काई मेळ क्लार्क लोकं लागू देत नाहीत… स्टॅपलरच्या पिनापासून घोटाळाय या जिल्ह्यात… मी पण एक पुस्तक लिहीणारंय… ‘बीड एक अतिभयाण वास्तव’

केके वडमारे : हे बघा बाप्पा असलंय इथं… अधिकार्‍यांनी येऊन इथल्या सिस्टीमला सुधारण्यापेक्षा हे लोक नावंच लै ठेवतेत. ‘बीड एक अतिभयाण वास्तव’ कुणामुळं झालंय? अधिकार्‍यांनी कसं अधिकार्‍यांसारखं वागावं… ह्यांनी इथं यायचं… थैल्या भरायच्या… अन् तिकडं आसाममध्ये नेऊन चहाचे मळे फुलवायचे… वरतून बीडलाच म्हणायचं लै अवघडंय इथं… कसल्या परीक्षा पास होऊन इथे खुर्च्या उबवाय येतात काय माहित..? आल्या आल्याच जिल्ह्याच्या दोघा बहाद्दरांची वाळू पट्ट्यात गट्टी जमली व्हती ती उगीच नाही… बाप्पा ह्यांना आशीर्वाद देऊन अडल्या नडलेल्या लोकांची कामं करायला सांगा…

मुषक : बाप्पा आता आवरतं घ्या… पुन्हा सगळे पत्रकार आल्यावर आपला आणखी मुक्काम वाढायचा… इथल्या पत्रकारांची अवस्था पण येगळी नाय…. अधिकारी काय अन् ते काय… सगळे एकच झालेत… सगळ्यांच्या पांचट गप्पा ऐकून आता रिकामा टाईमपास नकू… चला आता निघायलाच हवं…

(खालून गर्दीतून कुणीतरी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ घोषणा देतं. जड पावलांनी बाप्पा डॉ.ढवळेंनी बैलगाडीभरून आलेल्या कागदावर बसतात आणि मुषकासोबत परतीच्या प्रवास सुरु करतात. मागील 10 दिवसात काय काय झालं याची बाप्पा मनातल्या मनात उजळणी करतात. पुढच्या वर्षी हे सगळं चित्र बदलून जावं. चांगलं काही घडावं असं म्हणून बाप्पा कंकालेश्वरकडे तोंड करून आपल्या डॅडीला हात जोडून इहलोकीतून भक्तांचा निरोप घेतात..)

बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो.9404350898
दि. 19 सप्टेंबर 2021

मुषकराज वाचण्यासाठी क्लिक करा…
मुषकराज भाग 1 प्रस्थान…
मुषकराज भाग 2 फैसला ऑन दी स्पॉट…
मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…
मुषकराज भाग 4 संघर्ष कन्या…
मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…
मुषकराज भाग 6 कारखानदार…
मुषकराज भाग 7 राजकीय वाटण्या…
मुषकराज भाग 8 नमस्ते लंडन…
मुषकराज भाग 9 ‘रातर कमी अन् सोंगं फार’

मुषकराज भाग 10 आंदोलनजीवी…

Exit mobile version