mushakraj

मुषकराज भाग 8 नमस्ते लंडन

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

बीडच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर बाप्पांनी मुषकाला जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या दौर्‍यावर नेण्याची आज्ञा केली. स्वतः घडीची विश्रांती न घेता लगबगीनं बाप्पा मुषकावर स्वार झाले अन् पश्चिमेकडे प्रस्थान केलं. रस्त्यातील खड्ड्यांमुळे बाप्पांच्या बरगड्या दुखायला सुरुवात झाली. चिडून बाप्पा म्हणाले…

बाप्पा : मुषका जरा हळू चाल… इतका वेळ चांगल्या रस्त्याची सवय झाली होती. सगळ्या जिल्ह्यातील रस्ते कसे चकाचक असतील असं वाटलं होतं. पण हाच रस्ता इतका खराब कशामुळे झालाय जरा माहिती घेऊन सांग…

मुषक : तुम्ही काम सांगायचा अवदी… सगळं रेडी अस्तंय आपल्याकडं… मागं तीन वर्षापुर्वी हा रस्ता एमटी कंस्ट्रक्शनने केला होता. मागच्या चालकमंत्री या कंस्ट्रक्शनवर लै मेहेरबान… ह्यांनी जिथं जिथं कामं केली तिथं तिथं रस्त्याची अवस्था अशीच दयनीय… तरी बरं लिंबागणेशचा तुमचा नावकरी डाक्टर सगळं ढवळून टाकतंय. त्यो नस्ता तर रस्ता केला तर केला अन् नाय नाय केला असं झालं अस्तं…

बाप्पा : चांगल्यावर कुणी मेहरबान होत नाही… बोगस कामं करणार्‍यांच्या पाठीशी चालकमंत्री राहीले तर जनता पाठींबा काढून घेते हे आजच्या चालकमंत्र्यांना कळो म्हणजे झालं…

(बाप्पांना एकएक अपडेट मुषक देत असतानाच जामखेड मार्गे स्वारी आष्टीत पोहोचली. आष्टीत पोहोचतात ‘अर्धचंद्र’ बंगल्यातून कुणीतरी ‘नमस्ते लंडन झालं आमचं… पार हरीनाम सप्ताह करून टाकला राव गावानं… असं अस्तंय व्हंय… माणुसकी सुध्दा मुर्दाबाद केली राव ह्या कोरोनानं… वास्तुशांती हरीनाम केशव झालंय सगळं… मेंढ्या बकरी सारखी माणसं गाड्यात बसवून दवाखान्यात नेली राव… लै लै वाईट वाटतंय सगळं…. ऊस कुणालाबी तुटत नाय हे फकडेच तोडतेत बीड जिल्ह्यातले… असले काही बाही शब्द बाप्पांच्या कानावर पडले)

बाप्पा : मुषका मला ह्या माणसाकडं घेऊन चल… लै एैकलंय मी ह्यांचं… सभागृहात तर काय बोलतुय म्हणतान… हसून हसून परसाकडं जायची येळ येतीया आईकनार्‍यावर…

(मुषक अन् बाप्पांना दारात बघून)

नरेशआण्णा : लै लांब येणं केलं… ह्या गरीबाची तुम्हाला नुस्ती आठवण झाली तरी बी लै झालं बगा… तुमच्या बगर आमच्या गरीबाला कोण इच्यारतय… आमचं कवा बी ‘श्रीमंताचा गाडा आला अन् गरीबाचं झोपडं मोडा’ असंच व्हतंय… एै माऊलीऽऽऽ ते घंगाळं, चौरंग, पाट, हळदी कुकाचं आन् बरं… साक्षात गणराज आपल्या दारात आलेत… त्यांची पाद्यपुजा करायला नको का… मनसे तहे दिलसे बाप्पाचं माझ्या अंगणात स्वागतंय…

मुषक : राहू द्या आण्णा राहू द्या… तुमच्या घंगाळानं तर इथल्या बँकीत एकबी माणूस काम करायला तयार व्हईना… बाप्पांना जरा त्या ऊसतोड्यांबद्दलची अपडेट द्या…

नरेशआण्णा : (मोठ्यानं हसून) ऊसतोड्याचं बाप्पांना माहित नाय व्हंय… कशाला उगच ह्या गरीबाच्या तोंडातून वदवून घेताय… त्ये नेतृत्वपण आपल्याकडचं आलंय… त्यांचं नेतृत्व करायला आपल्या इतका अभ्यास कुणाचा हाई का… इदेशात बसून ऊसतोडीचा दर ठरवीत अस्तेत का? ह्यो फकड्या पडला तसा घरी बसला नाई… तवा कुठं ह्या ऊसतोड्यानं मला डोक्यावर घेतलंय…

मुषक : बाप्पा आपल्याल्या टाईम व्हतुंया… अजून आपल्याला ते सारखं नाव बदलणार्‍या पैलवानाकडं जायचंय…

नरेशआण्णा : असले कितीबी नावं बदलूद्या हो… ह्यो गबरू त्या पैलवानाला दहादा मातीत खुंदळीनार म्हंजी खुंदळीणार… मागच्या बारी पेट्या फुटूस्तोवर त्याला पत्ताच नव्हता आम्ही त्याचा कसा बाहुबली केलाय… सगळं झाल्याव मग लागला कट्टपा कट्टप्पा बोंबलायला… (हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽ) इलेक्शन आल्यावर झोपत अस्त्यात व्हंय… आमच्यासारखं डोळ्यात तेल घालून जागत्येत अन् त्यो भीमसेनी पैलवान खुशाल झोपायचा… मणलं ह्याला आता असंच झोपू द्या… नाय नाव बदलायला लावलं तर नावाचा नरेश सांगणार नाय…. ‘प्रतिघात’ नावाचा विजय मेहताचा पिच्चर बघीतलाय का बाप्पा..? त्यात नाही का त्यो कशाला बी मनतोय केंद्र को पुछ के बताता… नाई ह्यानं बी कशाला पण ‘नरेश को पुछ के बताता’ म्हणायला लावलं तर नरेश नाव सांगणार नाही…

मुषक : बाप्पा चला आता… उल्साक जिल्हा अजून फिरायचा राहीलाय… ह्याचं ऐकून ऐकून आपल्यावर पण आपलं नाव बदलून सांगायची येळ यायची… आधीच आपले सतराशेसाठ नावं त्यात पुन्हा ह्यांचं एक नाव अ‍ॅड व्हायचं… निगा लवकर घाई करा….


Tagged