mushakraj

मुषकराज भाग 9 ‘रातर कमी अन् सोंगं फार’

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

(आष्टीहून निघून माजलगाव अन् गेवराईचा दौरा करून बाप्पांना बीडमध्ये प्रशासनाचा आढावा घ्यायचा होता. मात्र आता हाताशी वेळ फारच कमी असल्याने मुषकराज भलतेच टेन्शनमध्ये आले होते. मुषकाच्या चेहर्‍यावरचं हे टेन्शन बाप्पांनं हेरलं आणि म्हणाले…)

बाप्पा : तुझ्या चेहर्‍यावर असे बारा का वाजलेत..? सुतक पडल्यावानी असा बसू नको. चल चल मला पुढचा दौरा सांग कुठे जायचं ते…

मुषक : आपल्या तीन भेटी गाठी राहील्यात अन् दिवस उरलेत दोन हे म्हंजी ‘रातर कमी अन् सोंगं फार’ असं झालंय… तुम्हीच सांगा आता मी कसं करावं… कितीही पळालं तरी उंदराची धाव कुठपर्यंत असणार? तुम्हाला पैल्या दिसापासून सांगत व्हतो परळीत लै थांबू नका… पण तुम्ही तिथून हलायलाच तैय्यार नव्हते. चार मुक्कामं तिथं ठोकले पण पिस्तुल कुणी ठेवलं ह्याचा अजून तरी लागला का मेळ..?

बाप्पा : मुषका काळजी करू नको… दिवस कमी राहीलेत ना तर थांब… सगळ्यांना बीडात बोलून घेतो… चल कर डायल ह्यो नंबर अन् कर हुकूम बीडाला येण्याचा…

मुषक : (माजलगावच्या ओमप्रकाश दादाला फोन लावत) हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ मी मुषक बोलतोय… तुम्हाला बाप्पांचा निरोपंय… आमचं माजलगावला येणं कॅन्सल झालंय अन् तुम्ही तातडीने बीडला यावं असा सांगावा धाडलाय बाप्पांनी…

ओमप्रकाश दादा : मुषका काई खुषखबर हाई का..? सरकार बिरकारचं वरचं कसंय? आपला लागतुंय का काही वशीला? द्या म्हणावं माझ्याकडं जिल्ह्याचं चालकमंत्रीपद… मग बघतो कोण व्हता त्यो पिस्तुल्या…

मुषक : वरच्या लोकांचं कवाच काय खरं नाय बगा… मंत्री मंडळात एक जागा रिक्त ठेवत्येत अन् कुणालाबी तीच जाग दाखवून हो म्हणत्येत अन् तसंच सरकार चालवितेत… आजची ताजी बातमीच अशीय की मुख्यमंत्रीच पुन्हा जुन्या दोस्ताची आठवण काढायलेत. सगळ्या चायनल वाल्यांनी पार धुरुळा उडवून टाकलाय औरंगाबादच्या कार्यक्रमाचा… तुमचं कुठंबी काय करायचं असल तर आपुन काय पैल्यासारखं कुणाचं पण फुकटात काम करीत नाही बगा… जसं तुमचं तसंच आमचं…

ओमप्रकाशदादा : आता कोणंय रे धुतल्या तांदळाचे… मला तर इलेक्शनला पैल्यापेक्षा दहापट पैसे लागाय लागलेत… चांगल्या चांगल्यांनी पैसा घ्यावा का… पैसा बघून पिसाळल्यावनीच करत्येत इलेक्शनमधी लोकं… सगळ्यांच्या चाली आता मला माहित झाल्यात… कुणाला कितीची थैली लागतीय… इलेक्शन लागण्याआधीच ह्य थैल्या भरून तयार अस्त्यात आपल्याकडं… पण आता या सगळ्यांचा ईट आलाय… त्यामुळं ठरवून टाकलं ही शेवटची निवडणूक… त्यामुळं लै हरीश्चंद्रावानी वागायचं नाय… फुकट कामाची लोकांना कसलीच कदर नाई… त्यांच्याशी किंमत ठरवूनच वागावं लागतंय… मतदानाच्या येळी बुथगणिक इतके द्या अन् तितके द्या करत्येत निर्लज्जा सारखे… पैसे काय इथं झाडाला लागलेत का? ज्यांनी ज्यांनी माझं झाड हलवले त्या-त्या लोकांकडून ‘वसुली’ करणार मंजी करणार… एकालाबी सोडीत नाय… पुन्हा वर थोबाड करून ईकास ईकास म्हणून बोंबलत सकाळीच बंगल्यावर धडकत्येत… ईकास करणारचंय… पण मलाबी माझ्या झालेल्या खर्च्यापाण्याचं बगावं लागल का नाई आधी… अचानक वरून सांगितलं ‘या इतके घेऊन तुमाली मंत्री करतो’ तर पुन्हा ह्याचे त्याचे थोबाड बघत बसायचे का?

मुषक : बरं करा तुमची ‘वसुली’ पण पैले बीडात या…

बाप्पा : (दोघांचं फोनवरचं संभाषण ऐकून मुषकावर भडकतात) मुषका आता माझ्या परस्पर असले उद्योग सुरु केले का तू… इथं वसुलीला आलोय का लोकांच्या हालअपेष्टा बगाय आलोय… अरे लोक मला विघ्नहर्ता म्हणतात…

मुषक : बाप्पा लोकाईच्या मनातलं काढून घेण्यासाठी तसं बोलावं लागतंय… अन् सामान्य लोकांसाठी जसे तुमी इग्नहर्ता तसे राजकारणी लोकांसाठी पण इग्नहर्ताच…

बाप्पा : चल दुसरा फोन लावून गेवराईच्या लखनआण्णाला बोलव…

मुषक : (बराचवेळ फोन लावून लावून कसलाच प्रतिसाद मिळत नाही)

बाप्पा : अरे लाव ना काय झाले? इतका येळ अस्तो का? दुपारचे बारा तर इथंच वाजलेत…

मुषक : कवाचा फोन लावतोय पण कुणीच उचलत नाय… ह्यांची झोप अजून झाली नसणार बगा… तुमी आले काय अन् कुणीबी आले काय… हा बाबा कुणाच्याच दौर्‍यात कुठच नस्तोय…

बाप्पा : मग आता गेवराईतून कुणाला बोलवितो?

मुषक : गुगलच्या सीईओला बोलवू का?

बाप्पा : नीट नाव सांग असं कोड्यात नकू बोलू…

मुषक : अहो ते नाई का आष्टीच्या नरेश आण्णाला त्यांनी सगळ्या मतदारसंघाची मतदानाची आकडेमोड करून सांगितली व्हंती. तवापासून ते आष्टीवाला त्यांना लै अभ्यासू म्हणून हा माणूस गुगलचा सीईओ पाह्यजी व्हंता असे टोमणे हाणतेत. अन् नेहमीच त्ये मोठ्या सायेबांच्या दौर्‍यात अस्तेत… लस आली तवा त्या पुण्याच्या लशीच्या फॅक्ट्रीत पण गेले व्हते… त्ये फॅक्ट्रीत गेल्यावर इकडे कलमा उठला हा हुशार माणूस गेवराईसाठी येगळ्याच लशी पाठवील मणून… त्यांचा अन् ओमप्रकाशदादांचा सध्या लै जिगरी दोस्तानाय… त्यांनाच बोलीवतो… त्यैच्या इतकी ‘अप टू डेट’ माहिती अख्ख्या जिल्ह्यात आपल्याला दुसरा कुणी देणार न्हाई… हॅलोऽऽऽ समरभैय्या…

मुषकराज वाचण्यासाठी क्लिक करा…
मुषकराज भाग 1 प्रस्थान…
मुषकराज भाग 2 फैसला ऑन दी स्पॉट…
मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…
मुषकराज भाग 4 संघर्ष कन्या…
मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…
मुषकराज भाग 6 कारखानदार…
मुषकराज भाग 7 राजकीय वाटण्या…
मुषकराज भाग 8 नमस्ते लंडन…

Tagged