mushakraj

मुषकराज भाग 6 कारखानदार…

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

मागच्या वर्षी लॅन्ड झालेलं ठिकाण बाप्पांना आठवलं. त्यांनी मुषकाला तिकडे निघण्याचा इशारा केला. मुषकाने बाप्पाच्या पुढ्यात दाखल होत उजव्या हाताने धोतराचा सोंगा हातात धरून दातात दिला. अन् गाडीला किक मारून गाडी स्टार्ट करून पुढे न्यावी तसं बाप्पांना घेऊन लगबगीने येडेश्वरी कारखाना जवळ करायला निघाले. वाटेत मुषकाने त्यांना मागील वर्षात काय काय उलथापालथ झाली याचा लेखा जोखा मांडायला सुरुवात केली.

मुषक : (अंबा कारखान्याकडे बोट करीत) हा कारखाना दिस्तोय का… ह्या कारखान्याने चालविणार्‍याला लै ‘हाबाडा’ दिला. इथला चेअरमन दोन ठिकाणच्या सुभेदार्‍या सांभाळणारा त्यामुळे ना हिकडं ना तिकडं असं होऊन बसलंय त्याचं… इथं एका सरपंचाला गाव सांभाळ म्हणलं तर आर्धा गाव आधी इरोधात जातुया… अन् मग उरलेल्यांच्या पाच वर्ष मिनतवार्‍या कराय लागत्यात. ह्या गड्यानं उसाच्या पैशासाठी जमीन इक्रीला काढली… पण देणं काय फिटत नाय बगा… आता कदरून ह्यो कारखानाच एकाला चालवायला दिलाय…

बाप्पा : ह्या गड्याला आता कितीदा सांगायचं… एका येळेला एकच काम कर म्हणून… मागं पण जिल्हा परिषदला दोन दोन गटातून उभा र्‍हायला… अन् झाला उताना… राहतो केजला अन् निवडणूक लढवितो माजलगावातून… आरं त्याला सांग जरा माजलगावात दम धरून र्‍हाय… तिथला बाबा चांगल्या चांगल्यांचा दम जिरीवतोय… बरं आता ह्यो कारखाना कुणी चालवायला घेतालाय सांग जरा लवकर…

मुषक : आपलेच शेतकरी पुत्र जबरंगी भाईजान… ह्या गड्यानं येडेश्वरी कारखाना लै सुपरफास्ट चालविला… आता त्यो ख्यातनाम कारखानदार झालाय… मोठ मोठ्या कारखान्याच्या ऑफर ह्या पठ्ठयाला घरी बसून चालून येत्यात. गडीबी मागं काय हटत नाय… त्यानं उजूक एक कारखाना चालवाय घेतलाय… पदमश्री विखे पाटील नावचा… म्हंजी तुमचा ह्यो शेतकरी पुत्र तीन तीन कारखान्याचा मालक झालाय आता…

बाप्पा : अंबा पर्यंत ठिक होतं. पण या विखे पाटलाच्या कारखान्यात उभ्या शेडशिवाय आहे काय? जबरंगीचा यंदाबी जिल्ह्याची निवडणूक लढवायचा विचार दिस्तोय… पण गडी मनातून कारखाना चालवित असल तर मग शेतकर्‍यांचं भलंच झालं म्हणायचं की…

मुषक : जबरंगी गडी मोठ्या निवडणुकीत पडला त्या दिवसापासून पुन्हा पेटून कामाला लागलाय… अख्ख्या जिल्ह्याचा ऊस वडायचा बगतुय… दरबी तसाच देतुय… शेतकरी जाम खुषय त्याच्यावर… त्यामुळं गड्याची यंदा चलती होणार एवढंच सांगतो आताच्या घडीला….
(तितक्यात जबरंगी भाईजान समोरूनच येताना दिस्तात. बाप्पांना बघून रस्त्यावरच ते थेट लोंटांगणच घालतात.)

जबरंगी : मला वाटलं यंदा तुम्ही आमच्यावर रुसले बिसले का काय? मागच्यावर्षी पैल्यांदा तुमी आपल्या इथं उतरले अन् यंदा चार दिवस परळीच सोडली नाय… माझ्याव तर तुमचा आशीर्वाद अस्तोच पण यंदा तुमच्या आशीर्वादाची गरज माझ्या भाऊला जास्तंय… बाप्पा हात जोडतो, पाया पडतो पण आमच्या भाऊला या तापातून सोडव बाबा… ह्या गरीब माणसाची एवढी इनंती एैक बाबा…

मुषक : चला उठा आता बाजुला सरका… अजून बराच दौरा शिल्लकंय… तुमचं म्हणणं टिपून घेतलंय…
(तितक्यात कुणीतरी जोर्‍यात ओरडतं. चंदूसेठ आले सरका सरका…)
चंदूसेठ : बाप्पा हे बरंय व्हंय… अंबाजोगाईहून थेट केजकडं येणं. वाटात आमच्या गरीब माणसाच्या घराला तुमची थोडीशी पायधूळ लागली असती तर जमलं नसतं का… (जबरंगीकडे बघून) नसल आमच्याकडं साखर कारखाना… पण साखर्‍यावनी माणुसकी अजून जिवंत हायकी आमच्यात बी… लोक नुसतं शेतकरी पुत्र म्हणवून घेतेत हो… पण शेतकरी दुखण्या बहाण्याला अडला तर कोणंय त्यांच्यासाठी… रात्री अपरात्री मीच उभं र्‍हातो की त्यांच्या सुख दुःखात… ही गोष्टी मी सांगायची गरज नाई… तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन एकदा इचारा कुणालाबी हा चंदूसेठ काय चीजय म्हणून… तिथल्या माणसांनी नाई ओ बोलू द्या… पण तिथल्या भिंती पण बोलू लागतील… तुम्ही इच्यारल्यावर… बाकी जास्तीचं काय मागत नाय पण त्या थापा मोदीला एकदा आस्मान दाखवायची मनातून इच्छाय… यंदा तेवढी ईच्छा पुरी कर… विघ्नहर्त्या… मग अख्ख्या अंबाजोगाईत नाय ‘बालाजी’चे लाडू वाटले तर नावाचा चंदू सांगणार नाय…

जबरंगी : बाप्पा चला आता निगा लौकर… रातभर थांबला तरी ह्याचं काय संपायचं नाई…

चंदूसेठ : (जबरंगीवर ओरडत) लै नकू शाना असल्याचा आव आणू… घंटा घंटा आमच्याच बंगल्याभाईर बसत व्हतास… आता कारखानदार झाला म्हणून तु बाप्पांना कायपण ऑर्डर सोडणार व्हंय… लै बघीतलेत असले…

मुषक : तुमी दोघं भांडू नका… आमाला निघावंच लागणारंय…दिवस कमी अन् सोंगं जास्त राहीलेत. आमच्याकडं कधी येताव म्हणून लै लोक वाट पाहून राहीलेत… आजच ह्या पेप्रात वाचलंय… क्षीरसागरांना बीडकरांची लैच काळजी लागलीय म्हणून….

बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो.9404350898
दि. 14 सप्टेंबर 2021

मुषकराज वाचण्यासाठी क्लिक करा…

मुषकराज भाग 1 प्रस्थान…

मुषकराज भाग 2 फैसला ऑन दी स्पॉट…


मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…


मुषकराज भाग 4 संघर्ष कन्या…


मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…

Tagged