nagpur-goa

समृध्दीच्या धर्तीवर नागपूर-गोवा महामार्ग, बीड जिल्हा जोडला जाणार

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

बीड, दि.8 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर-गोव्यादरम्यान 760 कि.मी. लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाला बीड जिल्हा जोडल्या जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्हे यातून जोडले जात आहेत. या महामार्गासाठी अंदाजे 75 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे नागपूर – गोवा अंतर केवळ आठ तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार असून सल्लागाराच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर – गोवा महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार असून तो सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे. वर्धा येथून हा मार्ग समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरला जोडणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. एकूणच हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून जाणार आहे. 701 किमी लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी 55 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तर नागपूर – गोवा महामार्गासाठी अंदाजे 75 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार असून सरकार आणि एमएसआरडीसी समोर भूसंपादनाचे मोठे आव्हान आहे.


आजघडीला रस्ते मार्गे नागपूर – गोवा अंतर पार करण्याकरिता 21 ते 22 तास लागतात. हे अंतर 1000 किमीहून अधिक आहे. हा महामार्ग झाल्यानंतर हे अंतर 760 किमी होईल. या महामार्गामुळे नागपूर – गोवा अंतर 20 ते 21 तासांवरून केवळ आठ तासांवर येईल, असे एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर एमएसआरडीसीने आता हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी महिन्याभरात सल्लागाराच्या निवडीसाठी निविदा मागविण्यात येण्याची शक्यता आहे. सल्लागाराने तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी बराच काळ लागणार आहे.

‘देवस्थानां’ना जोडणारा महामार्ग
नागपूर – गोवा महामार्गाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा महामार्ग राज्यातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका माता, सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, परळी-वैजनाथ, पंढरपूर, तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि पत्रादेवी या धार्मिकस्थळांना हा महामार्ग जोडला जाणार आहे.

महामार्गांचा त्रिकोण
एमएसआरडीसीकडून मुंबई-सिंधुदुर्ग हा अंदाजे 400 किमीचा ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग असे तीन प्रकल्प आता राबविण्यात येणार आहेत. या तिन्ही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक 30 हून अधिक जिल्हे जोडले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तीन महामार्गांचा त्रिकोण साधला जाणार आहे