pankaja munde dasara melava

नाराज असल्याच्या चर्चा बंद करा, मी 2024 च्या तयारीला लागलेय – पंकजाताई मुंडे

न्यूज ऑफ द डे राजकारण

सावरगाव घाट, दि.5 : मी नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने थांबवाव्यात मी आता 2024 च्या तयारीला लागले आहे. मला आता कुठलंही पद नको, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरीही तुम्ही ऐवढ्या मोठ्या संख्येने इथे येता, असेच प्रत्येक दसर्‍याला येत राहा, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केले. त्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मेळावे सभा म्हटले की एकमेकांवर चिखलफेक होते. पण हा मेळावा चिखलफेक करणारांचा नसून चिखल तुडवणारांचा आहे. मी कधीही कुणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. कुणावरही वाईट बोलत नाही. चर्चा पसरत असतात, हकीकत को तलाश करना पडता है, अफवाये तो घर बैठेही चलती है.
खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळवा चौपट झाला असता. प्रीतमताई म्हणाल्या, संघर्ष करो ही घोषणा बदला, पण कोणाच्या वाट्याला संघर्ष चुकला आहे? या मातीत भगवानबाबांचा जन्म झाला आणि त्याच मातीत गोपीनाथ मुंडेंसारखा संघर्षशील नेता तयार झाला. त्यामुळे मी संघर्ष सोडणार नाही. शिवाजी महाराजांनाही संघर्ष शेवटपर्यंत करावा लागला. भगवानबाबांनाही संघर्ष चुकला नाही. भगवान श्रीकृष्णालाही मथुरा सोडून द्वारका स्थापन करावी लागली. मुंडे साहेबांनाही शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. साडेचार वर्षाची सत्ता सोडली तर त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्याच मुंडे साहेबांची मी कन्या आहे त्यामुळे मी संघर्षाला घाबरत नाही.
भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष यामुळे मी कधी थकणार नाही, झुकणार नाही. संघर्ष सोडणार नाही. यावेळी त्यांनी संभाजी राजेंच्या होळीतून नारळ काढण्याच्या संघर्षाचा दाखला दिला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी संभाजीराजेंना सोन्याचं कडं दिलं होतं. माझ्या हातातील कडं तुम्ही आहात कोणत्याही होळीतून नारळ बाहेर काढायला मी मागे पुढे पाहणार नाही. संभाजी महाराजांचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळे मी संघर्ष करीत राहणार.
मला म्हणतात मी वारसा चालवते. हो मी चालवते, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा वारसा मुंडे साहेबांनी घेतला मुंडें यांच्याकडून मी पुढे वारसा मी चालवते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील वारसा चालवते. ज्या अमित शहांनी 370 चे कलम हटविले त्या अमित शहांच्या विचारांचा देखील वारसा चालवते. त्यात काय वाईट आहे? असा सवाल त्यांनी केला. मागे एक चुकीची अर्धवट क्लिप बाहेर काढून त्या क्लिपमुळे मला जसं काही पेटीतच बंद करून ठेवतील, असे काही जणांना वाटत होते. पण मी दुश्मनाविषयी देखील कधी वाईट बोलत नाही. मग मी माझ्या नेत्याविषयी कशी वाईट बोलेले? ज्योत यज्ञाला पेटवते. तशीच मी देखील एक ज्योत आहे. आणि ज्योत क्रांती तयार करेल असेही पंकजाताई म्हणाल्या.
लोकांना वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं. लोकांना वाटत असेल तर त्यात काय चूक आहे? मला काही मिळालं नाही म्हणजे मी नाराज आहे असे नाही. समाजाला काहीतरी मिळतंय याचं मला कौतूक आहे. समाजाला बांधण्यासाठी काही होत असेल तर ते मला मान्य नाही. माझा समाज हा समुद्र आहे. त्याला बांधणं शक्य नाही. समाजाच्या भिंती उभं करायचं काम जे कोणी करणार त्याला कदापि क्षमा नाही. मी एकवेळ क्षमा करेल परंतु ही लोक कधीच क्षमा करणार नाहीत.
देशात एवढा रानावनात कोणी मेळावा घेत नाही मी एक स्त्री आहे एवढ्या मोठ्या संख्येने मेळावा घेते. आजचा दिवसच स्त्रीचा आहे. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात एका स्त्रीला आज मानाचे स्थान दिले. ही अभिमानाची गोष्ट आहे.
कुणाला काय पद दिले याचे उत्तर द्यायला मी बांधील नाही, मला या प्रश्नांचे उत्तर देखील द्यायचे नाही. आता माझ्याकडे कुठलंही पद नाही. तरीही हे लोक मोठ्या संख्येने इथे येतात. सभा घेण्यासाठी मी राज्यभर फिरले. सभेमुळे हे आमदार वाढलेच की नाही? त्यामुळे मला परळीत कमी लक्ष द्यावं लागलं. हे सगळे लोक पक्षाचीच ताकद वाढवत आहेत. कुणाला काय पद दिले त्याच्याबाबत मला काहीही तक्रार नाही. त्यामुळे आता हे नाराजीचे राजकारण बंद करा, असे आवाहन पंकजाताईंनी केले. संगठन श्रेष्ट आहे व्यक्तीपेक्षा, तो राजा असो की रंक? पुढे कुठल्याही आमदारांची यादी आली तरी कृपा करून त्यात माझे नाव घालू नका, मी आता 2024 च्या तयारीला लागले आहे. त्यामुळे मी आता कुणावरही मी नाराज नाही. हे काय घरगुती भांडण आहे का? हे राजकारण आहे. त्यामुळे इथे वेळेची वाट पहावी लागते. मोठ मोठ्या लोकांच्या वाट्याला संघर्ष आलाय. मी मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही. मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. मी तुम्हाला केवळ स्वाभीमान, आणि संघर्ष देते, त्यासाठीच तुम्ही इथे आले. मी असत्य कधी बोलणार नाही, सत्यच बोलेल. तुमची मान खाली जाईल असे कधी वागणार नाही. मी तुम्हाला स्वाभीमान दिलाय त्यामुळे स्वाभीमानी रहा, असेही त्यांनी सांगितले.
माना की औरो के मुकाबले कुछ ज्यादा पाया नहीं मैंने,
पर खुश हूँ की खुद को गिरा के कुछ उठाया नहीं मैंने!

जरूरत से ज्यादा इमानदार हू मै
इसलिये सबके नजर मे गुन्हेगार हुँ मै!

जितना बदल सकते थे उतना बदल गये हम,
अब जिसको तकलीफ है वो अपना रास्ता बदले

अशी शेरोशायरीही पंकजाताई मुंडेंनी केली.
त्या म्हणाल्या, मी एक दुर्गेचं रूप धारण करू शकते. त्यामुळे आता 2024 मध्ये परळी मतदारसंघात तयारी करायची आहे. समर्पणाची तयारी करा. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून समुद्र कसा तयार होतो हे आपल्याला दाखवायचं आहे. मी पदासाठी कुणाकडे जाणार नाही, काही मागणार नाही. त्यामुळे सगळे जण आपआपल्या मतदारसंघात जा आणि तयारीला लागा.
मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझ्यासाठी आहात. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाला बट्टा लागेल असे वागणार नाही. मी तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही माझ्या पदाची अपेक्षा करायची नाही. मीडीयानेही माझ्या पदाची काळजी करायची नाही, असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केले.
आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी मला काही मागायचे असेल तर या डोंगर कपारीत राहणार्‍या लोकांच्या जीवनात चांगले दिवस येऊ दे. जसे जन्माला घातले स्वाभीमानी लोकांच्या पोटी तसाच हा स्वाभीमान मरेपर्यंत राहू दे अशी मागणी त्यांनी या दसरा मेळाव्यात देवीच्या चरणी केली.
या मेळाव्यास यशश्री मुंडेंची आवर्जुन उपस्थिती होती. खा.प्रीतमताई आणि पंकजाताई यांनी आवर्जुन यशश्री मुंडेंचे नाव घेतले.

Tagged