teacher

पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीवरील बंदी उठवली

करिअर न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई – राज्यातील हजारो डीएड, बीएड पदवीधारकांसाठी राज्य शासनाने खुशखबरी दिली आहे. पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणार्‍या सहा हजार शिक्षकांच्या जागा भरण्यावरील बंदी सरकारने उठवली आहे.
राज्यात 2010 नंतर शिक्षक भरतीच झालेली नाही. शासन दरवर्षी टीईटी, सीईटी घेऊन या पदविधारकांच्या भावनांशी खेळ करीत होते. मागच्या वर्षी शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय झाला होता. मात्र कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे राज्य सरकारने सर्वच नोकरभरतीवर तात्पुरती बंदी घातली. मात्र आता शिक्षकभरतीवरील बंदी उठवण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली 7 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमच्या आंदोलनाला यश -अर्चना सानप
दरम्यान या भरतीवरील बंदी उठविल्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांच्याद्वारे शिक्षक भरती मुद्याबाबत सातत्याने आंदोलने करण्यात आली होती. कोरोना काळात या पदवीधारकांनी औरंगाबाद ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता. ट्विटर, फेसबूक वरील ट्रेंड चालविण्यात आले होते. त्याचं हे यश असल्याची प्रतिक्रीया संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष अर्चना सानप यांनी दिली आहे.

Tagged