mushakraj

मुषकराज भाग – 7 राजकीय वाटण्या…

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

(जिल्ह्याच्या पूर्व भागाचा दौरा आटोपून बाप्पा आणि मुषकराज चंपावतीनगरीत दाखल झाले होते. सोबत सगळ्या पक्षांचे हजारो कार्यकर्ते ‘मंगल मुर्ती मोरया’च्या घोषणा देत होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असतानाच बाप्पांना नगर रोडवरील एका बंगल्यातून मोठा कलमा ऐकू आला. बाप्पांनी मुषकाला तिकडे चालण्याची आज्ञा केली. मुषकाने जी हुकूम म्हणत वार्‍याच्या वेगात ‘बंगला’ जवळ केला. लगबगीने बंगल्यात दाखल होत सगळ्यांना शांत होण्याची आज्ञा केली. बाप्पा आले म्हणून सगळे एकदम चिडीचूप झाले. बायाबाया एकमेकीचा हात धरून आतल्या घरात गेल्या… घरातली सगळी ज्येष्ट मंडळी एका रांगेत खुर्चीवर जाऊन बसली… बाकी सगळा चिंगुरखाना बाप्पासमोरील सतरंजीवर जाऊन बसला… आता बाप्पांनी एकावेळी एकाच जणाला बोलण्याची परवानगी दिली. लगेच घरातील मोठे पदाधिकारी असलेले धनदीप बोलायला उठतात. (तेवढ्यात बाहेर ‘भैय्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ कार्यकर्ते मोठ्यानं घोषणा देऊ लागतात.)

धनदीपभैय्या : (आधी बाहेर येऊन सगळ्यांना शांत करतात. आणि मोठ्या आवाजात बाप्पांसमोर तक्रारवजा सूर लावतात.) आम्ही लै दिवसापासून शांतचयत बाप्पा… पण आता आम्हाला काई शांत बसणं व्हत नाई… आमची लाईट कट केली तवा बी आमी शांत… आमाला कॉलेजातून भाईर काढलं तवा बी आमी शांत… आमाला सगळ्या इस्टेटीतून भाईर काढलं तरीबी आमी शांतच… आमचे एक एक माणसं फोडले तरीबी आमी शांत… तुमीच सांगा शांत तरी कवर बसावं..? तरी बरं 2019 ला म्या झटका देऊन आमदार झालो… नायतर आतापस्तोर ह्यांनी आमाली खाऊन टाकलं असतं…

योगेंद्रभैय्या : लै नका आवाज वाढवू… कार्यकर्ते आमच्याकडंबी हैत. तुमच्यामुळं तर आतापस्तोर वाट लागली आमची… मोठे म्हणून आमी आदर करतो म्हणून काय कायबी ऐकून घ्यायचं का? र्‍हायला इस्टेटीचा क्वश्चन… तर आमच्या पप्पांनी बिंदुसरा, करपरा नदीकाठ विकसीत करायचा ध्यास घेतलाय… आता त्यातून आमी चार पैसे कमविले तर त्यात तुमचं पोट का दुखतं..? अन् तुमचा वाटा तुम्हाला मिळत न्हाई का..? घ्या बरं शपथ..! तुमाला ज्याचा इकास करायला दिला त्यो इकासच तुमी गायब केला… त्यात आमचा काय दोष..? पैसे कमवायला पण टॅक्ट लागतीया… नुस्त्या मनगटाच्या बळावर पैसा येत अस्तुुय का..? आता तर तुमाला आमदार केलंय जनतेनं… इकास करायला अख्खा मतदारसंघ पडलाय की… ह्यांच्या आमदारकीचं पण असं झालंय ना की ‘दिड दिसात अन्..ऽऽऽऽऽऽऽ’ जाऊद्या पुढचं नाई बोलत… सगळे कार्यकर्ते नुस्ते च्याँव च्याँव करायलेत… त्यांचं बघा जरा… उगच आमच्याकडं येत नाहीत ते…

मुषक : (बाप्पाच्या कानात) आपुन हे भांडणं कितीबी दिवस थांबून मिटवा तरीबी त्ये मिटणार न्हाईत. झोपलेल्यांना जागा करता येईन पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना कसं जागं करावं… जरा तुमच्या डॅडीवानी ‘तिसरी आँख’ उघडून डोकं चालवाच…

बाप्पा : सगळा चिंगुरखाना जरा खाली बसा… घरातील ज्येष्ट मंडळींशी मला सल्लामसलत करू द्या… (असं म्हणत बाप्पा त्यांच्या डाव्या बाजुला वळून खुर्चीवर बसलेल्या ज्येष्ठांना बोलायची संधी देतात.)

गुरुदत्तआण्णा : घरात एकोप्यानं रहा… जागतिक पातळीवरच सध्या कौटुंबिक स्वास्थ्य बिघडलंय… त्यात आपलं घर तरी अपवाद कसं राहणारं… यातून मुक्ती मिळविण्यासाठी अध्यात्माशिवाय तरणोपाय नाही… भांडणं खेळा तुम्ही पण सणावाराला एकत्रित यायला हवं असं माझं मत आहे…

धनदीपभैय्या : मुद्याचं बोला मुद्याचं… आमी कवाबी आमचा वाटा कुठंय असं मुद्याचं बोललं की ह्यांनी नुस्त्या इंटरनॅशनल बाता मारायच्या… आमच्या डॅडीची जिंदगी गेली हे ऐकण्यात अन् तुमची सेवा करण्यात… आमचे डॅडी सणावाराला ठाण्यात असायचे तवा नाई आठवला घरातील सणवार… पण ही नवी जनरेशन लै येगळीय… इथं आधी वाटा मग काम…
(तितक्यात घरातील बायकांचा गलका ऐकायला येतो. सगळी मिटींग तिकडे वळते. थोरल्या जाऊबाई अन् धाकट्या जाऊबाई एकमेकींचा हात हातात घेऊन गौराईचं ऊत्साहात स्वागत करताना दिसतात. तर त्यांची नेक्स्ट पिढी ह्या हातून त्या हाती गौराई देत ऐकमेकींना टाळ्या देत गौराईची भक्तीभावाने स्थापना करतात.)

मुषक : (हे सर्व पाहून बाप्पांच्या कानात) आलं का सगळं लक्षात… आता फक्त घरातील ज्येष्ठांना बाजुला घेऊन ईच्च्यारा अजून काय प्लॅन हाई का लोकांना फसवाईचा?

बाप्पा : गुरुदत्त आण्णा घरातील महिलांचा हा ऐकोपा बघून आम्हाला आनंद झाला. पण ह्या जेन्टस् मंडळीचं काय करायचं ठरवलं आहे तुम्ही… काही प्लान रेडीय का?

(गुरुदत्तआण्णा खिशातील एक कागद काढून बाप्पांना वाचायला देतात…बाप्पा हा कागद वाचून झाल्यानंतर मुषकाकडे तो कागद देत मोठ्याने वाच म्हणून सांगतात.)

मुषक : येणार्‍या निवडणुका लक्षात घेऊन घरातील तिसर्‍या पिढीत काही भांडणं होऊ नयेत यासाठी ज्येष्ठांनी हा प्लान सुचवलाय… यात असं लिहीलंय की… येणारी लोकसभा मी (म्हणजे गुरुदत्त आण्णा) लढविल. ईधानसभेला धनदीपभैय्या फिक्स असतील… ईधान परिषदेवर ‘इंडीयाभुषण’ यांना संधी मिळण्यासाठी आपुन एकोप्यानं सगळ्या पक्षाच्या प्रमुखाला शिफारस करायची… थोरल्या, अन् मधव्या घरी जिल्हा परिषदेचा एक एक मेंबर… आरक्षण पडलं तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद… तिन्ही घरात एक एक नगरसेवक, उपाध्यक्षपद मधव्या घरी, शहराची संपूर्ण मालकी इंडियाभुषणच्या पोराला, बाकी ग्रामीण इलाका मधव्याचा अन् राज्यात मीच अशी माझी मांडणी. याला सगळ्यांनी अनुमोदन द्यावं…
(मुषकाने वाचलेल्या यादीला घरातील सगळेच मेंबर एका सुरात अनुमोदन देत भांडण मिटल्याचं सांगतात.)

बाप्पा : गुरुदत्त आण्णा सगळ्या वाटण्या तुमच्याच घरात म्हणल्यावर कार्यकर्त्यांनी काय करायचं..? ही सरळ सरळ लोकशाहीची थट्टाय…

गुरुदत्तआण्णा : बाप्पा तुमची तळमळ समजू शकतो… पण हल्ली कार्येकर्ते तरी कुठं कार्यकर्त्यांसारखं वाग्तेत… आता तुमी नाई का मुषकाला मुषकच ठेवलंय… मुषकानं पण गपगुमान मोदक खायचे सोडून आमच्या घराचे वासे कशाला मोजत बसायचे? अन सतरंज्या उचलायला कुणी हवं का नको…. अन् हे भांडण तुमाला माहित नसल अस्सं थोडीचंय… तुमाला सगळं माहितंय… पण न कळल्याचं सोंग आणता तुम्ही पण… फक्त आता एक करा… जातानं कार्यकर्त्यांना सांगू नका आमचं भांडण मिटलं म्हणून…
क्रमशः

  • बालाजी मारगुडे
    कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
    मो.9404350898
  • दि. 16 सप्टेंबर 2021
Tagged