EKNATH MAHARAJ PALAKHI SOHALA

421 वर्षानंतर संत एकनाथ महाराज दिंडीचा मार्ग बदलला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

भेटी लागे जीवा ! लागलीसे आस !!

चंद्रकांत अंबिलवादे, पैठण, दि.29 : महाराष्ट्राच्या संतपरंपरेत मानाचे स्थान असलेल्या पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याची 421 वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. पायी होणारी दिंडी यंदा शिवनेरी बसने पंढरपुरकडे प्रस्थान करीत असून बसच्या मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.

पैठण येथील एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन एकनाथ महाराजांची दिंडी दरवर्षी पायी पंढरपुरकडे जाते. औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावात या पालखीचा मुक्काम असतो. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने पालखी रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचे अनुदान देऊन हा मार्ग आणखी चकचकीत बनविला. मात्र कोरोना साथीमुळे यंदाची दिंडी पायी न जाता शिवनेरी बसने जात आहे. शिवाय पारंपारिक मार्ग वगळून ही दिंडी शेवगाव, पाथर्डी, कडा, करमाळा, जेऊर मार्गे पंढरपूर येथे महामंडळाच्या शिवशाही बसने पंढरपूर येथे पोहोचणार आहे. 12 जून रोजी या पालखी सोहळ्याचे पारंपारिक प्रस्थान झाले होते. तेव्हापासून हा पादुका पालखी सोहळा पैठण येथेच 18 दिवस मुक्कामी होता. मंगळवार 30 जून रोजी सकाळी 9 .30 वाजता उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पालखी सोहळा 20 मानकरी वारकरी यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. आरोग्य विभागाने पालखी सोहळ्यासोबत पंढरपूर येथे जाणार्‍या वीस मानकरी वारकरी यांची वैद्यकीय तपासणी केली आहे.

 

पारंपारिक पालखी रस्त्यावरील गाव झाले सूने सूने ….

421 वर्षापासून संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पैठण येथून प्रस्थान झाल्यानंतर मुंगी, हादगाव, बोधेगाव, लाडजळगाव, पारगाव (भगवानगड) शिरूर कासार, राक्षसभुवन, रायमोह, तांबा राजुरी, पाटोदा, डिगोळ, खर्डा, दांडेगाव, तिंत्रज, आनाळा, परंडा, बिटरगाव, कुर्डू, आरण ( सावता महाराज समाधी स्थान) हाळे, शिराढोन, वाखरी ( पादुका स्थान) पंढरपूर (नाथ महाराज चौक) या गावांनी मुक्काम करीत पुढे जात होता. यावेळी मार्ग बदलल्याने नेहमीची गावांना पालखी सोहळ्याची रुखरुख लागून राहणार आहे.

Tagged