ramkrushna bab patil

औरंगाबादचे माजी खा. रामकृष्ण बाबा पाटील यांचं निधन

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण, दि.2 : औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे आज बुधवारी पहाटे दुःखद निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आप्पासाहेब पाटील यांचे ते वडील होत.
बुधवारी सकाळी 6ः30 च्या सुमारास माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता त्यांच्या नातेवाईकांनी जाहीर केली. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम वैजापुर तालुक्यातील दहेगाव येथे दुपारी 4 वाजता होणार आहे. रामकृष्ण बाबा पाटील यांनी दहेगावच्या सरपंच ते खासदारकी पर्यंत मजल मारीत आपल्या कार्याचा ठसा सहकार क्षेत्रातून उमटवला होता. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1932 दहेगाव तालुका वैजापुर याठिकाणी शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण केवळ सातवी पास होते. 1977 मध्ये तेे गावाचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, वैजापूर पंचायत समितीचे सभापती, वैजापूर विनायक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, राज्य बँकेचे मुंबई संचालक, 1994 वैजापूरचे आमदार, 1999 औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार, 2004 जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, असा त्यांचा राजकीय प्रवास राहीला आहे. राजकारणात कार्यरत असताना बाबांनी अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करताना बाबा ही पदवी मिळवली होती. त्यांनी गोदावरी उपसा जलसिंचन योजना राबवून हजारो एकर जमीन ओलिताखाली आणली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध संस्था स्थापना करून वैजापूर, पैठण तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पैठण तालुक्यातील वाघाडी गावामधील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Tagged