शिवसंग्राम भाजपच्या दावणीला बांधून मराठा समाजाशी बेईमानी

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. यात राजकारण नको होते. परंतू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकांचे राजकारण सुरुच आहे. भाजपच्या दावणीला शिवसंग्राम बांधून समाजाशी बेईमानी हे आपल्याना शक्य होणार नाही, अशा शब्दात शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांच्यावर टिका केली. बीड येथील आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि.25) ते बोलत होते.

पुढे बोलताना अविनाश खापे म्हणाले, मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाला याला राज्य सरकार जबाबदार आहे, हे अर्धसत्य आहे. याला भाजप व आरएसएस तितकेच जबाबदार आहे. अंतर्गत खेळ्या करून जाणीवपूर्वक आरक्षण मिळू दिले नाही. गत पाच वर्षात राज्यात आणि केेंद्रात एकहाती सत्ता होती. त्यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या मराठा समाजातील कुटुंबियांना 10 लाख आर्थिक मदत आणि एका वारसाला शासकीय नोकरी हे दिलेले आश्वासन का पाळले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, अनेक बाबी ह्या बोलण्यासारख्या आहेत. त्या मी समाजमाध्यमांवर जाहीर देखील केल्या आहेत. शिवसंग्रामध्ये काय चालते? हे सगळ ठाऊक झालं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात बोललो की आमदार विनायक मेटेंना मिरच्या झोंबतात. आमच्यासाठी समाज महत्वाचा आहे. आम्ही बोललो की तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. आपण गेल्या पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय केलं? असा प्रश्न देखील खापे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आमदार विनायक मेटे यांनी समाजाला अंधारात ठेऊन हुजरेगिरी केली आहे. या बाबी खटकतात म्हणून मी त्या मांडल्या होत्या. त्यामुळे मुजोरी करत आमदार विनायक मेटे यांनी मला विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले. त्यामुळे आज मी जाहीरपणे शिवसंग्रामच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. तसेच, भाजपमध्ये विलगीकरणास शिवसंग्रामला खूप सार्‍या शुभेच्छा असा टोला देखील शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी लगावला आहे.

Tagged