मुषकराज : भाग 3 , ‘कवडीची किंमत देत नाय’

(1616 क्रमांकाच्या फॉर्च्युनरने अंबाजोगाईची दिशा पकडली होती. सुसाट निघालेल्या फॉर्च्युनरने अचानक करकचून ब्रेक मारला. त्यामुळे टुणूक टुणूक उड्या मारून मागच्या शीटच्या बेल्टला धरून बसलेले मुषकराज धाडकनी पुढच्या शीटवर येऊन आदळले.)
मुषकराज ः आगा आयोयऽऽ बबोवऽऽ बाबोवऽऽ आगाऽ आईऽऽ आईऽ ईऽऽ ईऽ
बाप्पा ः मुषकराज जरा नीट बसा. अशा उड्या मारल्यावर असंच होतंया. मला तर वाटलं हा रस्ता आता काचेसारखा गुळगुळीत झाला असेल?
गजरंगअप्पा ः (मोठ्याने हसून) ह्यो तर काईच नाही. अजून तर लै बगायचंय तुमाला. अख्खा जिल्हा फिरायचाय बाप्पा. मागच्या वर्शाच्या जिल्ह्याच्या ‘चालकमंत्री’ नुसतं बजेट बजेट करीत व्हत्या. पण एक काई रस्ता धड केला नाई बगा. म्होरल्या वर्शी तुमी यावा. तुम्ही इथून स्केटींग करीत परळीला जाताल, असा रस्ता नाय झाला तर राजकारण सोडून देईन.
बाप्पा ः आयोवऽऽ नका नकाऽ असलं भलतं-सलतं साहस नका करू. आज नाय तर उद्या तुमाला राजकारणात भविष्ययं.
गजरंगअप्पा ः कसलं भविष्य अन् कसलं काय? ह्या राजकारणाचा आता लैच कदर आलाय बगा. हे पांढरे कपडे घालणं लै सोपंय का? कितीबी अन् कसंबी काम करा, लोक नावंच ठेवणार! आता ह्येच बघा कालच तुमी आमच्याकडे आले अन् ह्या पेपरवाल्याला कुठून कसं काय कळलं देव जाणे. लगेच मणले ‘बजरंगी सॅनीटायझर घ्यायला बाप्पा चेडेश्वरी कारखान्यावर!’ मी काय मणतो काय गरज व्हती का? आल्ते का बाप्पा तर आल्ते. आम्हाला आमचं खासगी जिवन हाय का नाय? मणलं तुमी आलाव तर दोनचार सुखाच्या गोष्टी व्हतील. पण छेऽऽ हे पेपरावाले… एकाने तर भर इलेक्शनमधी हरभर्‍याचं माप काढलं? मी मंतो पुरावा काय ह्यांच्याकडं असलं छापायला? मह्या इरूध्दचा एकतरी आरोप ह्या पेपरावाल्यांनी सिध्द करावा. पुन्हा सांगतो राजकारण सोडून देईन. आवो माझ्याइतका प्रामाणिक माणूस ह्या राजकारणात तुमाला सापडायचा नाय.
बाप्पा ः चालायाचंच हो. त्यांना बातम्या नाय मिळाल्या तर त्यांनी छापायचं काय? त्यांचं म्हंजी कसं अस्तया ‘घोडा घास से दोस्ती करे तो खायेगा क्या?’
गजरंगअप्पा ः हां त्येबी खरचंय मणा. पण ह्यांना मीच कावून दिस्तो.
बाप्पा ः आरं बाबाऽऽ मी आता जिथं जाईल तिथली चर्चा होईल. थांबव थांबव, तुझी गाडी इथंच थांबव.
गजरंगअप्पा ः कामून? तुमी तर मणले ना मला परळीला जायचंय?
बाप्पा ः हो म्हणलो होतो. पण थांबव… इथं जरा… हे नुसतं लोखंड दिस्तंय ते ‘गणेश हाडसकर’चाच कारखाना का रे?
गजरंगअप्पा ः (मान वळवून) व्हयं! त्येचाच हाय!
बाप्पा ः मग थांबव इथं.
(गाडी थांबताच मुषकराजांनी गाडीबाहेर टुणकन उडी मारली. तितक्यात समोरुन अंबाजोगाईकडं सुसाट निघालेल्या 09 फोर्ड कंपनीच्या गाडीनं मुषकराजांना जोराची हुलकावणी दिली अन् पुढं जाऊन साईडला थांबली. गाडीतून एक जाडजूड माणूस खाली उतरला. उतरताच त्यांनं आधी दोन्ही हातांनी पॅन्ट वर सरकवली. बाप्पांना पाहून त्यांनी लांबूनच दोन्ही कर जोडून लोंटागण घातलं.)
चंदूसेठ ः या बाप्पा या, आजच वाचलं पेपरात तुमी सॅनीटायझर घ्यायला ‘चेडेश्वरीला’ गेले म्हणून.
बाप्पा ः हो! साक्षात मातोश्रीचा आदेश व्हता. पृथ्वीतलावर कोरोना पसरलाय अन् तिथं जायचं तर सॅनीटायझर सोबत ठेव. म्हणलं चेडेश्वरी इतकं चांगलं सॅनिटायझर मिळणार कुठे?
चंदूसेठ ः यंदा असलं नंबर एक सॅनिटायझर तुम्हाला दिलं असतं. पण जाऊद्या पुढल्या वर्षी नक्की देऊ. यंदा आमच्या नेत्याचा कारखानाच बंदयं!
(तेवढ्यात चंदूसेठ हातातल्या पिशवीतून एक लाडू बाहेर काढतात. गावरान तुपात तळलेल्या त्या लाडूचा सुंगंध लपला जात नव्हता. मुषकराजानी क्षणाचाही विलंब न करता चंदूसेठच्या अंगावर उडी घेतली)
बरं ते जाऊद्या हा प्रसाद घ्या! मुषका तुलाही घे!
बाप्पा ः (आश्चर्यचकीत नजरेने) प्रसाद? हा तर साक्षात बालाजीचा प्रसाद दिस्तोय? कोरोनात तिरुपतीला तुम्ही कधी गेले होते?
चंदूसेठ ः कसला तिरूपती अन् कसलं काय आपल्याला तिथले लाडू लै आवडतात म्हणून जो तिकडे जाईल तो माझ्यासाठी दोन लाडू घेऊन येतो म्हणजे येतोच.
बाप्पा ः बरं बरं (मुषकराज आणि बाप्पा दोघेही एकमेकाकडे बघतात आणि लाडू पटकन खाऊन घेतात.)
चंदूसेठ ः बरं आता तुमी आपल्या फोर्डमध्ये बसा. तुमाला सगळी अंबाजोगाई दाखवितो.
बाप्पा ः ते अंबाजोगाईचं राहु द्या. आपले सुकुमार काय म्हणतात?
चंदूसेठ ः काय म्हणणारयंत? त्यो बसलाय गाडीत. बळंच आणला आज सकाळी सकाळी बाहेर! अजून लहानंय त्यो. त्याला म्हणलं सकाळी लवकर उठ तर तो हमखास उशीरा उठणार. तोपर्यंत माझ्या 100 जणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दोन मौती, चार सांत्वन, दोन राख सावडण्याचे विधी, चार बारश्याचे कार्यक्रम झालेले असतात.
बाप्पा ः अगा बाबोवऽऽ तुमी तर दुसरे शरद पवारच की?
(इतका वेळ शांत असलेल्या गजरंगअप्पांना शरद पवारांचं नाव ऐकताच एक वेगळंच स्फुरण चढलं. त्या दोघांचा संवाद मध्येच थांबवत गजरंगअप्पा बोलू लागले.)
गजरंगअप्पा ः (मोठ्याने हसत) आमचे नेते कुठं? हे कुठं?
(हा संवाद सुकुमारांनी ऐकलेला असतो. ते गाडीतून खाली उतरतात. अन् गजरंगआप्पांवर भडकतात.)
सुकुमार ः तुम्हाला सांगून ठेवतोय. आता लै झालं तुमचं. हे काय इलेक्शन नाही. आरोप करायला अन् हिणवायला. आपल्याशी पंगा घेतल्यावर काय होतंय हे कळलंच असेल तुम्हाला?
गजरंग ः अरे जारे जाऽऽ पोरा सोराच्या असल्या बोलण्याला मी ‘कवडीची किंमत देत नाय’!
(या एका वाक्यानं तिथं स्मशान शांतता पसरते. दुसर्‍या दिवशीच्या पेपरात या एकाच वाक्यानं धुमाकूळ घातलेला असतो.)
क्रमशः

(हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा कुठल्याही जिवीत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)