बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून आचारसंहितेचा भंग तसेच अमली पदार्थांची तस्करी होऊ नये म्हणून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत बीड कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या बसची तपासणी केली. यावेळी एका बसमध्ये तपासणी केली असता एका व्यक्तीच्या बॅगमध्ये 40 किलो गांजा आढळून आला. या तरुणास पुढील कारवाईसाठी उमरगा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
राम विठोबा हिरवे असे आरोपीचे नाव असून उमरगा पोलीस अधिक तपास करत आहेत.