लाचखोर एसीबीच्या जाळ्यात; बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना!

बीड


बीड दि.31 : जिल्ह्यात लाचखोरी कमी होत नसल्याचे वारंवार होणाऱ्या एसीबीच्या कारवाईतून दिसून येत आहे. बुधवारी (दि.31) पाटोदा येथील कृषी विभागातील कृषी सहायक याचा अतिरिक्त पदभार असलेल्या लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई केली. (Patoda krushi office acb trap)

कृष्णा महादेव आगलावे (वय 40 वर्ष, मुळ पद – कृषी सहाय्यक, अतिरिक्त पदभार- मंडळ कृषी अधिकारी पाटोदा क्रमांक 2, तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाटोदा) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे नावे असलेल्या शेतामध्ये कांदाचाळ मंजूर झाली होती. तक्रारदार यांनी कांदा चाळीचे काम पूर्ण केले असून तक्रारदार यांना अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी कांदा चाळीची पाहणी केलेला अहवाल व बिले अपलोड करण्यासाठी आगलावे यांनी पंचासमक्ष दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती दीड हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र परदेशी, अमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांनी केली.