acb trap

आठ लाखाच्या लाचेची मागणी; माजलागावचा सुपर क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

बीड

केशव कदम | बीड
बीड दि.27 : लाचखोरी बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. बांधकाम परवाना देण्यासाठी अहमदनगर येथील महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.पंकज जावळे यांनी आठ लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.पंकज जावळे हे मूळचे माजलगाव तालुक्यातील असून या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे.

डॉ.पंकज जावळे (वय-47, पद- आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर (वर्ग -1 ) मूळ रा.माजलगाव जि.बीड) व श्रीधर देशपांडे (वय 48, पद- लिपिक टंकलेखक अतिरिक्‍त पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग – 3 )रा.अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह 4 के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे दि.18 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज 254531 या क्रमांकाने केला. सदर परवानगीसाठी लाचखोर पंकज जावळे याने लाचेची 9 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली व त्यास स्विय सहाय्यकाने प्रोत्साहन दिले. तक्रारदार यांना डॉ.जावळे आयुक्त आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने जालना एसीबीकडे धाव घेतली. 19 जून रोजी लाचेची पडताळणी करून आठ लाख रुपयांची लाचेची मागणी पुन्हा पंचसमक्ष केली. याप्रकरणी पोलीस ठाणे तोफखाना जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आधिक्षक संदीप आटोळे, आले अधीक्षक मुकुंद आघाव, सहाय्यक सापळा अधिकारी शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांनी केली.

Tagged