MATORI

मनोज जरांगेंच्या मातोरीत दोन गटात मोठी दंगल, डीजे, दुचाकी फोडल्या, अनेकांची डोकी फुटली

बीड


मातोरी, (ता. शिरूर जि. बीड) दि.27 : शिरूर तालुक्यातील मातोरी गावात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावात दोन समाजाचे दोन गट आमने सामने आल्याने प्रचंड दंगडफेक झाली. अनेक दुचाकी फुटल्या आहेत. डीजेचे देखील मोठं नुकसान झालेले आहे. सध्या मातोरी गावाच्या आजुबाजुने प्रचंड संख्येने लोक जमा झालेले असून परिसरात तणावाची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मातोरी हे गाव मनोज जरांगे पाटील यांचे आहे.

ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आज भगवानगडावर जाणार होते. त्यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ डिजे लावून पाडळशिंगीकडे निघालेले होते. त्यांनी सोबत आणलेल्या डीजेवर मातोरीत आल्यानंतर दोन गाणे वाजवले. काही कार्यकर्त्यांनी इथे एका समाजाविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे दुसर्‍या बाजुने मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डीजे बंद करून गावातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र मातोरी ग्रामस्थ आणि हाकेंना आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पर्यायाने दोन्ही गटात प्रचंड दगडफेक झाली. यात अनेकांची डोकी फुटली आहेत. तर डीजेचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. चार ते पाच दुचाकीं यावेळी फोडण्यात आलेल्या आहेत. परिसरात प्रचंड संख्येने लोक जमलेली आहेत. पोलीसांनी जास्तीची कुमक मागवून मातोरीकडे धाव घेतलेली आहे.