बीड – माजलगाव येथील गावरान ढाब्याचे मालक महादेव गायकवाड यांचा काल किरकोळ कारणावरून ग्राहकाशी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर महादेव गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली होती. यात महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे (सर्व रा. आनंदगाव) यांना मंगळवारी पहाटे आळंदी (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडी ढिल्पी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घालण्यात आली. तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा देखील या मारहाणीत जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. पैकी महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे व अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या घटनेत कृष्णा माणिकराव थावरे आणि ऋषिकेश रमेशराव थावरे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी आज या तिघाही आरोपींना पुण्यातील नगर परिषद चौक आळंदी येथून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार भागवत शेलार, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, राजू पठाण, बप्पासाहेब घोडके, सुरवसे, चालक गणेश मराडे यांनी केली.