सोन्यासाठी सोनाराचा केला प्रिप्लॅन मर्डर!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा शिरूर

स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीसांना प्रकरणाचा लावला छडा
बीड
दि.23 ः ‘माझं नविन लग्न झालं आहे. घाईगडबडीत सोने खरेदी करायचे राहून गेले.’ असं सांगत एका सराफाला सोन्याची ऑर्डर दिली. दागिणे घेऊन त्यास बोलावून घेतले. सलुनच्या दुकानात कोंडून त्याकडून दागिणे घेत त्याची निर्घणपणे हत्या केली. त्यानंतर मित्राच्या मदतीने दुचाकीवरुन त्याचा मृतदेह परजिल्ह्यात नेऊन शेतात पुरून टाकला; पण बीड स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान करत कुठलाही सुगावा नसताना अवघ्या काही तासात बेपत्ता सराफाच्या प्रिप्लॅन मर्डरचा छडा लावला. या प्रकरणी दोघांना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल सुभाष कुल्थे (वय 25 रा.शिरुर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (रा.भातकुडगाव ता.शेगाव जि.अहमदनगर ह.मु.शिरुर) याने विशाल यास फोन करुन माझे लग्न झाले आहे. पत्नीला काही दागिणे खरेदी करायचे आहेत. असे सांगून पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स दिले. त्यानंतर विशालने ऑर्डरप्रमाणे दागिने बनवले. भैय्या गायकवाडने त्यास फोन करुन तू बनवून आणलेल्या दागिन्यांसह तुझ्याकडे सोन्या-चांदीचे जे दागिने आहेत ते घेऊन ये, माझ्या घरच्यांना जे पसंत पडतील ते घेतील. असे म्हणून त्याला दागिन्यांसह बोलावून घेतले. त्यानुसार दुचाकीवर घेऊन शिरूर येथील राक्षसभुवन चौकात असलेल्या सलूनच्या दुकानात नेले. त्यापुर्वीच तेथे धिरज अनिल मांडकर (वय 21, रा. पाथर्डी) व संतोष लोमटे (वय 21, रा.भातकुडगाव, ता.शेगाव जि. नगर) हे दबा धरून बसलेले होते. सराफा आणि भैय्या गायकवाड दुकानात येताच दुकानाचे शटर बंद करण्यात आले. त्यानंतर विशालचा गळा दाबून त्याला बेशुद्ध केले, दुकानातली कात्री त्याच्या तोंडात खुपसून त्याचा निर्घणपणे खून करण्यात आला.
खून केल्यानंतर भैय्या गायकवाड याने त्याचे रक्ताने भरलेले शर्ट बदलून दुकाना बाहेर येऊन मयताच्या भावाकडून दोन बिस्लेरीच्या बाटल्या घेतल्या आणि त्याच दिवशी भैय्या गायकवाड आणि त्याचा मित्र याने एका दुचाकीवरून प्रेत गोदडीत गुंडाळून रुग्णासारखे घेऊन थेट नगर जिल्ह्यातील भातकुडगाव गाठले. तेथे गेल्यानंतर त्यांनी घरून खोरे घेऊन भैय्या गायकवाड यांच्या शेतातच मृतदेह पुरला. ही घटना 20 मे रोजी घडली. त्यानंतर सराफा विशाल कुल्थे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी शिरूर ठाण्यात दिली. त्यावेळी नातेवाईकानीं विशाल हा भैय्या गायकवाडसोबत दुचाकीवर बसून गेल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीसांनी तपास सुरू केला. आरोपी धिरज मांडकर आणि संतोष लोमटे यांना ताब्यात घेतले. त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती देत मृतदेह भातकुडगावात पुरल्याचे सांगितले. रविवारी सकाळी तेथील तहसीलदार आणि पंचासमक्ष मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाड हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस उपअधीक सुनिल जायभाये, विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत, शिरूर पोलीस ठाण्याचे पोनि.सिद्धार्थ माने, सपोनि.पवार पोना.सतीश कातखडे, संगीता क्षीरसागर, पोशि.अलिम शेख, मुकुंद सुसकर, पोना.आहेर, पोना. साळुंके, सुदाम पोकळे आदींनी केली.

Tagged