बीड येथे मराठा समाजाच्या बैठकीत घेतला ठराव
नेत्यांच्या व्यासपीठावर आणि सभेला न जाण्याचाही निर्णय
बीड, दि.2 : बीड शहरातील हॉटेल राजलक्ष्मी (मुक्ता लॉन्स) येथे आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामीण भागातून आलेल्या मराठा समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने आपआपले विचार व्यक्त करण्याची संधी देण्यात आली त्यानंतर सर्वांनी येणार्या लोकसभा निवडणुकीत आपआपल्या गावातून लोकवर्गणी करून किमान दोन उमेदवारांनी फॉर्म भरावा, असा निर्णय घेण्यात आला. या ठरावाला उपस्थित सगळ्यांनीच हात उंचावून पाठींबा दिला.
बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे जो पर्यंत सरकार सगे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करीत नाही तोपर्यंत कुठल्या नेत्यांच्या स्टेजवर मराठा समाजाच्या पुढार्यांनी जायचे नाही. गेले तर त्यांनी समाजाच्या बैठकीला अथवा कार्यक्रमाला यायचे नाही असा ठराव संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या सोशल मीडिया चालवणार्या व्यक्तींनी फक्त मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थच पोस्ट टाकायच्या, इतर नेते, महिला यांच्यावर किंवा इतर जातीवर असभ्य भाषेत, असंस्कृतपणे कोणीही टिका करीत बसायचे नाही. सोशल मीडियावर अनेकांनी बनावट अकाऊंट उघडून त्याला मराठा वाटतील अशा पध्दतीने आडनावे दिलेली आहेत. अशा अकाऊंटवरून भडकाऊ भाषा वापरून मराठा तरूणांना उचकवण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी याकडे दुर्लक्ष करावे, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय कुणबी नोंदी सापडून दिलेल्या मोडी लिपी तज्ञ संतोष यादव यांचे अभिनंदन करणारा ठराव यावेळी घेण्यात आला. कुणबी प्रमाणपत्रं वाटपाचे काम सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे हे काम स्पीडने करण्यात यावे, असाही ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे.