मुंबई दि.14 : राज्यातील सगळीच पक्षीय समिकरणे बदलली असल्याने जिल्ह्यात आम्ही महायुतीचे सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहोत. धनुभाऊंच्या सोबत असण्याने आमचा परळीतील त्रास नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे प्रीतमताई pritam munde यांच्यापेक्षाही जास्त मताने मी निवडून येईल, अशी प्रतिक्रीया पंकजाताई मुंडे pankaja munde यांनी व्यक्त केली आहे. त्या वरळी येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
पंकजाताई मुंडे यांना भाजपकडून काल बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यासंदर्भात आज त्यांनी मुंबई, वरळी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली. पक्षाने आपल्यावर दिलेल्या जबाबदारीचे मी स्वगात करते असे त्या म्हणाल्या. यावेळी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे देखील उपस्थित होत्या.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांचे निधन झाल्यानंतर डॉ. प्रीतमताई ह्या आपलं डॉक्टरकीचे करिअर सोडून राजकारणात आल्या होत्या. आता त्यांची जागा मला घ्यावी लागत असल्याने मनात थोडी हूरहूर आहे. धाकधूक पण वाटतेय. पण नविन अनुभव आहे, पक्षाने दिलेल्या उमेदवारीचं मी स्वागत करते, असे देखील पंकजाताई मुंडे म्हणाल्या. मला जितकी वाट पहावी लागली तितकी प्रीतमताईंना वाट पाहावी लागणार नाही. मी तिला विस्थापित होऊ देणार नाही, असे देखील पंकजाताई म्हणाल्या. आजपर्यंत मी दुसर्यांसाठी प्रचार करत होते. पण आता स्वतःसाठी मतं मागायची आहेत. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला संस्कार मानणारी मी आहे, असेही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
दोन समुदायात भांडण नको हीच माझी भुमिका
जेव्हा आपण एका संविधानिक पदावर असतो तेव्हा आपण कोण्या जातीचे, समाजाचे नसतो. मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझी बॅलन्स भुमिका आहे. मला दोन समुदायात भांडण लावायला आवडत नाही. मी मंत्री असताना ज्या बुथवर आम्हाला 20 मतदान मिळाले त्या गावाला देखील मी भरभरून निधी दिला आहे. मुंडे साहेबांनी माझ्यावर तसे संस्कार केलेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे त्यांचे संस्कार आहेत, अशी स्पष्ट भुमिकाही पंकजाताई मुंडे यांनी मांडली.
पंकजाताई आमच्या नेत्या- प्रितमताई मुंडे
मी खासदार असताना पंकजाताई ह्याच माझ्या नेत्या होत्या. आताही त्याच माझ्या नेत्या आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीला आम्ही पूर्ण करू, अशी प्रतिक्रीया खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.