धकलखनौ : रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे भारतीय संघाचे कर्णधार व उप कर्णधार लखनौच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. पण यावेळी नेहाल वधेरा मुंबई इंडियन्ससाठी धावून आला. नेहाल मुंबईच्या संघासाठी तारणहार ठरल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. नेहालच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाला २० षटकांत १४४ धावा करता आल्या.
मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजीला उतरला आणि रोहित शर्माने चौकारानिशी दमदार सुरुवात केली. पण या चौकारानंतर रोहितला एकही धाव करता आली नाही. कारण मोहसिन खानने रोहित शर्माला मार्कस स्टॉइनिसकरवी झेलबाद केले आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का दिला. रोहितला यावेळी ४ धावाच करता आल्या. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण यावेळी स्टॉइनिसने सूर्याला बाद केले आणि मुंबईला दुसरा धक्का दिला. पंचांनी सुरुवातीला सूर्याला बाद दिले नव्हते, पण लोकेश राहुलने डीआरएस घेतला आणि त्यामध्ये सूर्या झेलबाद असल्याचे समोर आले. सूर्याला यावेळी १० धावा करता आल्या. सूर्या बाद झाल्यावर मुंबईला एकामागून एक दोन धक्के एकाच संघात बसले.
तिलक वर्माला रवी बिश्नोईने सात धावांवर बाद केले आणि मुंबईला तिसरा धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीला आला तो हार्दिक पंड्या. यावेळी कर्णधार हार्दिककडून मुंबईच्या संघाला मोठ्या आशा होत्या. पण हार्दिकने यावेळी अपेक्षाभंग केला. कारण पहिल्याचा चेंडूवर हार्दिक बाद झाला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही. ही सर्व संघाची पडझड ईशान किशन पाहत होता. त्यानंतर ईशान किशन आणि नेहाल वधेरा यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी झाली. ही जोडी आता मुंबईला मोठी खेळी साकारून देईल, असे वाटत होते. पण ईशान किशन ३२ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फोडली. त्यानंतर वधेरावर संघाची धावसंख्या वाढवण्याची मोठी जबाबदारी होती आणि त्याने या गोष्टीला न्याय दिला.
वधेराने यावेळी ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली. वधेरामुळे मुंबईला १०० धावांचा पल्ला गाठता आला. वधेरानंतर मोहम्मद नबी जास्त काळ टिकू शकला नाही, पण टीम डेव्हिडकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. डेव्हिडने अखेरच्या षटकात दमदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच मुंबईच्या संघाला या सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभारता आली