खा.शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झाला प्रवेश
बीड दि.10 : राज्यातील सत्ता संघर्षानंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांसह मोठा गट सत्तेत सहभागी झाला. मात्र शरद पवार यांच्या गटात प्रवेश वाढतच आहेत. रविवारी (दि.10) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे (pooja more) यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधे शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे व शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या असंख्य समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूजा मोरे यांचे कौतुक करत पुढे त्या प्रत्येक कार्यक्रमात दिसतील, त्यांना बळ दिले जाईल असे सांगितले. यावेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अमोल कोल्हे, आ.रोहित पवार, राजेश टोपे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रक्षा खडसे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आदींची उपस्थिती होती.
चांगल्या कामामुळे पूजा मोरे साहेबांच्या
नजरेतून चुकल्या नाहीत – राजेश टोपे
पूजा मोरे ही लढवय्या आहे. तिला शेतीची खूप आवड असून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय तिला सहन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी त्या राजकारणात आल्या. आज मराठवाड्यातील चांगल्या वक्त्या म्हणून ओळख आहे. त्यामुळे साहेबांच्या नजरेतून पूजा मोरे चुकल्या नाहीत. स्वतः त्यांना साहेबांनी बोलावून घेत परिवारासह चर्चा केली. आता प्रवेश करून त्या मुख्य प्रवाहात आल्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई सोडणार नाही- पूजा मोरे
माझ्यासाठी शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य बांधवांनी रक्त सांडले, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, आज त्यांच्यासमोर नतमस्तक होते. सामान्य कुटुंबातील गोदाकाठची ही बहीण पुढे जावी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले. मी सुद्धा वडापाव ठेचा भाकर खाऊन, प्रवासात लॉज न करता पेट्रोल पंपावर झोपून शेतकऱ्यांची रस्त्यावरची लढाई लढले. यापुढेही ही लढाई सोडणार नाही पण लोकशाहीच्या मंदिरात शेतकऱ्यांचा आवाज पोहचला पाहिजे. त्यासाठी काट्याकुठ्याची वाट सोडायचे नाही. आपल्या बळीराजाचा आवाज व्हायचं आहे. शरद पवार साहेबांचे मोरे कुटुंबावर कायम उपकार आहेत. ते उपकार फेडण्याची ही वेळ असल्याचेही मोरे म्हणाल्या. तसेच लेकीचे भाषण सुरू असताना बापाच्या डोळ्यात पाणी पाहिले. आणि त्याच दिवशी ठरवले की या बापासाठी लढायचे, शेतकऱ्यांचा आवाज शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पूजा मोरे म्हणाल्या.