घरी बोलावून झाडली गोळी; परळी खून प्रकरणात बबन गितेसह इतरांवर गुन्हा!

बीड

परळी दि.30 : घरी बोलावून मरळवाडीचे सरपंच बाबुराव आंधळे यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.29) रात्री घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेत दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. याप्रकरणी गोट्या गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता आरोपींनी कट रचून सरपंच आंधळेंना महादेव गित्तेच्या बँक कॉलनीतील घरी बोलावून घेतलं. तेव्हा, बबन गित्तेंनी सरपंच आंधळेंना शिवीगाळ करत तू पैसे आणले का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यावर आंधळेंनी आईवरून शिव्या देऊ नका, अशी विनंती बबन गित्तेंना केली. यादरम्यान बबन गित्ते आणि सरपंच आंधळेंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर गित्तेंनी कमरेची बंदूक काढत सरपंच आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली. तर, राजाभाऊ नेहरकरनं सरपंच आंधळेंच्या डोक्यात कोयत्यानं घाव घातले. यात आंधळेंचा मृत्यू झाला. महादेव गित्तेनं फिर्यादी गोट्या गित्तेला जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नातून गोळीबार केला. ही गोळी गोट्या गित्तेच्या छातीत उजव्या बाजूला लागली. त्यासह मुकुंद गित्ते आणि राजाभाऊ वाघमोडेनं गोट्या गित्तेला बुक्क्यानं मारहाण केल्याचं 'एफआयआर'मध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी शशिकांत बबन गित्ते (रा.बँक कॉलनी, परळी), मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते (रा. वाघबेट ता. परळी), महादेव उद्धव गित्ते ( रा. बँक कॉलनी, परळी), राजाभाऊ संजीवन नेहरकर (रा. पांगरी ता. परळी), राजेश अशोक वाघमोडे (रा. पिंपळगाव गाडे ता. परळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
Tagged