प्रतिनिधी । बीड
दि.13 : प्रशासन अजुनही कुठल्यातरी धुंदीत वावरत आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली असून त्यात केवळ 60 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना शिल्लक राहील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा हा दावा निव्वळ हास्यास्पद ठरणार असून अजुनही प्रशासन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन ठोस आकडेवारी काढायला तयार नाही हेच यातून दिसत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये सांगण्यात आले आहे की जिल्ह्यात आठ साखर कारखाने असून त्यांची दैनंदिन गाळप क्षमता 32 हजार मेट्रीक टन एवढी आहे. उसाचे एकूण क्षेत्र 94 हजार 222 हेक्टर असून त्यातून 88 लाख 28 हजार 350 मे. टन उत्पादन अपेक्षीत आहे. आजपर्यंत सर्व कारखान्यांनी 54 लाख 60 हजार 301 मे.टन उसाचे गाळप केले आहे. 31 मे पर्यंत आणखी 4 लाख 24 हजार 594 मे. टन गाळप होईल. बीड जिल्ह्या बाहेरील कारखान्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर गाळप केले असून हंगाम संपेपर्यंत त्यांच्यामार्फत देखील उर्वरित उसाचे गाळप करण्यात येणार आहे. काही सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त तालुक्यात असल्याने उसाखालील दुबार नोंद झालेली असल्याने बीड जिल्ह्यात जास्त उसाचे क्षेत्र दिसून येत आहे. सर्व कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत झालेल्या चर्चेनुसार 31 मे अखेर जिल्ह्यात अंदाजे 60 हजार मे.टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 100 टक्के ऊस गाळप करण्यासाठी प्रशासनाकडून उपायायोजना करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार सर्व उसाचे गाळप होईपर्यंत कुठलाही कारखाना बंद केला जाणार नाही, अशा सुचना सर्व कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. 100 तोडणी होण्याच्या दृष्टीने 59 ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टर) मागणी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे. सदर यंत्रासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर लागणारे खर्चाचे दर कारखान्याच्या व्यवस्थानासोबत चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. त्यांनी आवश्यक ते हार्वेस्टर तत्काळ उपलब्ध करून घेऊन उर्वरित उसाचे गाळप पूर्ण करणेबाबत जिल्हाधिकारी बीड यांना सुचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी हवालदिल न होता कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे अवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.