आईमुळे वाचले दुसर्यामुलाचे प्राण
परळी दि.13 : विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र या घटनेत दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी दुसर्या मुलानेही विहिरीत उडी मारली, वेळेवर आईने विहिरीत दोर सोडल्यामुळे दुसर्यामुलाचे प्राण वाचले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे घडली. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीसांनी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढले.
शेख सादिक शेख हमीद (58) व शेख रफीक शेख सादिक (25, दोघे रा. बरकतनगर, परळी) अशी या पिता-पुत्राची नावे आहेत. दादाहरी वडगाव शिवारात शेख सादिक यांची शेती असून चिकटून नातेवाईक शहादत पठाण यांची जमीन आहे. शहादत पठाण यांच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी 13 मे रोजी शेख सादिक गेले होते. यावेळी पाय घसरून ते विहिरीत कोसळले. त्यांचा मुलगा शेख रफीक शेख सादिक हा त्यांना वाचविण्यासाठी सरसावला. मात्र, वडिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात तोही बुडाला. दोघांना वाचविण्यासाठी शेख साजीद शेख सादिक याने विहिरीत उडी घेतली. मात्र, तोही बुडू लागला, तेव्हा प्रसंगावधान राखत आईने दोर विहिरीत टाकला व त्यास पकडून तो वर आला. दरम्यान, बुडालेले पिता-पुत्र विहिरीच्या तळाशी गेले. परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व सहकार्यांनी धाव घेतली. पिता-पुत्रास बाहेर काढण्यासाठी शर्थीेचे प्रयत्न सुरू असून अंधार असल्याने अडचणी येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रात्री उशीरा मृतेदह पाण्याच्या बाहेर काढण्यास पोलीसांना यश आले.